
डोंबिवली दि.14 जुलै :
गिर्यारोहण क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘गिरीमित्र’ पुरस्कार यंदा माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली म्हणजेच मॅड संस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. मुलुंड येथे महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या २२ व्या गिरीमित्र संमेलनात सुप्रसिद्ध गिर्यारोहक लक्पा नोर्बु शेर्पा यांच्या हस्ते माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली संस्थेला सन्मानित करण्यात आले. (Mountaineers Association Dombivli (MAD) awarded prestigious ‘Girimitra’ award)
माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली ही संस्था १९८५ पासून गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक गड किल्ले आणि हिमालय मोहिमा, विविध वयोगटासाठी साहस शिबिरे- कॅम्पच्या यशस्वी आयोजनासह ही संस्था आपल्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. या संस्थेतर्फे श्रीमलंगगड रेसक्यू ऑपरेशन, रक्तदान शिबीरे, किल्लारी भूकंप, भूज भूकंप येथे वैद्यकीय सेवा देण्यात आली. 2021मध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या महाड शहरातील बाधित घरांची साफसफाई करण्यातही या संस्थेने मोलाचा वाटा उचलला. याशिवाय गेली अनेक वर्षे संस्थेतर्फे प्रस्तरारोहण शिबीरे, पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग आयोजित करण्यात येते. हनुमान टिब्बा, लडाखी, शीतीधर, फ्रेंडशिप, व्हाइट सेल, केदारदोम, जोगिन, श्रीकैलास, स्टॉक कांगरी, कांग यात्से, विधान पर्वत, कामेट, अबिगमिन अशी हिमालयातील अनेक अवघड शिखरेही या संस्थेने पादाक्रांत केली आहेत. त्याशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर, मारखा व्हॅली असे हिमालयातील अनेक ट्रेकचेही संस्थेने यशस्वीपणे आयोजन केले आहे. तर गड – किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक मोहीमांचे आयोजन संस्था करीत असते.
यावर्षी संस्थेतर्फे जानेवारीमध्ये लेह चादर ट्रेक, सप्टेंबरमध्ये सतोपंथ ट्रेक तसेच “साहस” सिंधुदुर्ग, विजयदुर्ग प्रतिकृती, शिवकालीन शस्त्रे, मोडी लिपी पत्रे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याशिवाय वट पौर्णिमेनिमित्त फळ झाडांचे वाटप, शाळेसाठी प्रिंटर, आदिवासी विभागात कपड्यांचे वाटप शहापूरजवळील साकडबाव येथे वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रमही या संस्थेने राबवले आहेत.
दरम्यान गिर्यारोहण क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.