
ओला आणि घरगुती घातक कचरा दररोज नेहमीप्रमाणे उचलण्यात येणार
कल्याण डोंबिवली दि.29 ऑक्टोबर :
कल्याण-डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विस्कटलेली स्वच्छतेची घडी पुन्हा बसवण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकारातून शाश्वत शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार शहरातील सुका कचरा उचलण्यासाठी नविन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. यानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी ठराविक प्रकाराचा सुका कचरा उचलण्यात येणार असून नागरिकांनी ठरलेल्या दिवसांप्रमाणे आपापल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून मगच कचरा देण्याचे आवाहन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे. तर ओला आणि घरगुती घातक सुका कचरा हा नेहमीप्रमाणे दैनंदिन उचलण्यात येणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. (New dry waste collection schedule implemented in Kalyan-Dombivli; citizens urged to segregate garbage properly)
‘ओला, सुका दैनंदिन आणि सुका कचरा ठराविक दिवसांनुसार वर्गीकृत करून द्यावा लागणार’…
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन आणि वाहतुकीची कामे नियमितपणे केली जात आहेत. मात्र काही ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांसाठी नवे साप्ताहिक कचरा संकलन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता घरोघरी होणारा ओला ,घरगुती घातक कचरा दैनंदिन आणि सुका कचरा ठराविक दिवसांनुसार वर्गीकृत करून द्यावा लागणार आहे. पूर्वी बुधवार आणि रविवार हे दिवस सुका कचरा संकलनासाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही भागांमध्ये या दिवशी कचरा देण्यात अनियमितता दिसून आल्याने सुधारित नियोजन करण्यात आल्याचे कोकरे यांनी सांगितले.
“असे आहे सुका कचरा संकलनाचे नविन वेळापत्रक…”
– सोमवार: प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या
– मंगळवार: कागद, मॅगझिन, गत्ता
– बुधवार: कागद, पुठ्ठा
– गुरुवार: प्लास्टिक, प्लास्टिक भाग
– शुक्रवार: ई-वेस्ट, धातू, स्विच, टायर
– शनिवार: काच व काचेसंबंधी वस्तू
– रविवार: कागद, पुठ्ठा
वरती दिलेल्या या ठराविक दिवसांनुसार नागरिकांनी वर्गीकृत कचरा देऊन स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. चुकीचा किंवा वर्गीकरणाशिवाय कचरा देण्यात आलेला कचरा उचलण्यात येणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“हीच ती वेळ…अभी नहीं तो कभी नहीं…”
शहरांतील कचरा व्यवस्थापनात गेल्या काळात एक विस्कळीतपणा आला आहे. ज्यावर नागरिकांनी आताच कचरा वर्गीकरणाची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे महापालिकेने लागू केलेल्या या मोहिमेकडे “हीच ती वेळ…अभी नहीं तो कभी नहीं” अशा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी नागरिकांनीही एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केडीएमसी उपआयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे. यापूर्वी तर कोविडसारख्या कठीण काळात नागरिकांच्या सहकार्यामुळे वाडेघर डंपिंग ग्राउंड बंद करून दाखवले होते. ते पाहता ही काही कठीण गोष्ट नसल्याचेही त्यांनी सांगितले.


























