Home ठळक बातम्या कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा धावण्याच्या दिशेने पुढचे पाऊल ; रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक,...

कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा धावण्याच्या दिशेने पुढचे पाऊल ; रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक, आरटीओ अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू

अनेक वर्षांची नागरिकांची मागणी प्रत्यक्षात उतरणार

कल्याण दि.22 ऑगस्ट :
अनेक वर्षांपासून कल्याण शहरातील रिक्षा मीटरप्रमाणे चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये मीटरनुसार रिक्षा सेवा उपलब्ध असताना कल्याणातच या विषयाला काहीही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. मात्र आता प्रवाशांच्या या दीर्घकाळाची मागणी प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात कल्याण स्टेशनवरील एक मार्गिका ही मीटर रिक्षांसाठी आरक्षित केली जाणार असून या पार्श्वभूमीवर रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक, आरटीओ अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. (Next step towards metered rickshaws in Kalyan; Efforts by rickshaw union, railway manager, RTO officials continue)

गेल्या दशकभरापासून कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षासेवा चालवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कधी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगत तर कधी रिक्षाचालकांचा विरोध असल्याने हा प्रश्न इतक्या वर्षानंतरही प्रलंबित राहिला. तो मार्गी लावण्याच्या उद्देशाने रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रणव पेणकर, रेल्वे स्टेशन मास्तर आर. मीना, आर टी ओ अधिकारी प्रशांत देवरे यांच्यासह जीआरपी आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी आज स्टेशन परिसरात पाहणी केली. आणि पुढील आठवड्याभरात मीटर रिक्षांसाठी स्टेशन परिसरातील एक मार्गिका आरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती रिक्षा युनियनचे नेते प्रणव पेणकर यांनी यावेळी दिली.

तसेच रिक्षाचालकांनी या नियमाचे पालन करण्यासाठी रेल्वे अधिकारी, आरटीओ, जीआरपी, आरपीएफ हे पुढील महिनाभर याठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षारांगेच्या मागील बाजूस असलेल्या मार्गिकेतून या मीटरद्वारे रिक्षा उपलब्ध होणार आहेत.

आगामी काही आठवड्यांत या उपक्रमाला गती मिळण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासन, रिक्षा युनियन, आरटीओ यांच्या एकत्रित प्रयत्नातून कल्याणात रिक्षा मीटरनुसार धावण्याचे स्वप्न अखेर साकार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्थानिक प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा सुरू झाल्यास प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय दूर होईल आणि रिक्षा प्रवास अधिक पारदर्शक तसेच सोयीस्कर बनेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा