Home ठळक बातम्या वेदनादायी घटना ; कल्याण पूर्वेत रिक्षावर झाड पडून तिघांचा मृत्यू

वेदनादायी घटना ; कल्याण पूर्वेत रिक्षावर झाड पडून तिघांचा मृत्यू

रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश

कल्याण दि. 6 मे :
अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलेमोठे झाड चालत्या रिक्षावर पडून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. यामध्ये रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा समावेश असून त्यामध्ये एक महिला प्रवासी असल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.  (Painful incident; Three killed after tree falls on rickshaw in Kalyan East)

आज रात्री नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांच्या लखलखाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र या वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की कल्याण पूर्वेत काही ठिकाणी भलेमोठे वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये काही ठिकाणी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली असतानाच चिंचपाडा परिसरात चालत्या रिक्षावरही मोठे झाड पडल्याची माहिती मिळाली.

दरम्यान ही माहिती मिळताच स्थानिक नागरिक, समाजसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रिक्षावर पडलेले भलेमोठे गुलमोहराचे झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून या रिक्षातील तिघा जखमींना रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.

यामध्ये रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा समावेश असून त्यामध्ये एक महिला प्रवासी आहे. या तिघांची नाव अद्याप समजू शकलेली नाहीये. तर या घटनेमध्ये रिक्षेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा