Home ठळक बातम्या फॉल सिलिंगचा भाग कोसळला; डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीसाठी काही काळ बंद

फॉल सिलिंगचा भाग कोसळला; डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीसाठी काही काळ बंद

रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

डोंबिवली दि.24 मे :
संस्कृतिक डोंबिवलीचे प्रतीक समजले जाणारे सावित्रीबाई फुले कलामंदिर पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील भागामध्ये फॉल सिलिंगचा भला मोठा तुकडा तुटून पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसी प्रशासनाने येथील सर्व शो रद्द करत नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Part of the ceiling collapsed; Savitribai Phule Theatre in Dombivli closed for some time for repairs)

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 मे रोजी रात्रीच्या सुमारास हा फॉल सीलिंगचा तुकडा अचानक तुटून खाली पडला. यावेळी कोणताही नाट्यप्रयोग सुरू नसल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी समक्ष जाऊन नाट्यगृहाची पाहणी करत स्ट्रक्चरल इंजिनियरला यासंदर्भात अहवाल देणेबाबत निर्देश दिले आहेत.

तर सावित्रीबाई फुले कलामंदिर हे नाट्यगृह सुरू होऊन आता 18 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मतानुसार फॉल्स सिलिंगचे फ्रेमिंग गंजलेले आणि कमकुवत झाल्यामुळे ते नव्याने करणे आवश्यक बनले आहे. परिणामी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले कला मंदिराची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी सद्यस्थितीत हे नाट्यगृह काही काळ बंद ठेवण्याला महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंजुरी दिली आहे. मात्र यामुळे नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षकांची होणारी गैरसोय पाहता त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तर फॉल सिलिंगचा कोसळलेला तुकडा लहान जरी असला तरी येथील प्रेक्षकांची आणि नाट्यकर्मींची सुरक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून दुरुस्तीसाठी हे नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा