
कल्याण डोंबिवली दि. 23 सप्टेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ फोटो फॉरवर्ड करण्यावरून कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पंतप्रधान मोदींचा मॉर्फ फोटो फॉरवर्ड करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला साडी नेसवून भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. तर आपल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे दिलेली वागणूक म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. (PM Narendra Modi’s morphed photo case; BJP office bearers made Congress office bearer wear saree, Congress demands strict action against those involved)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान सहन करणार नाही – नंदू परब भाजप जिल्हाध्यक्ष..?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ केलेला फोटो दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश (मामा) पगारे यांना प्राप्त झाला होता. हा फोटो मामा पगारे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर डोंबिवली भाजपकडून त्याविरोधात तीव्र शब्दांत नाराज व्यक्त करण्यात आली.याविरोधात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांची आज सकाळी भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉर्फ फोटोची पोस्ट फॉरवर्ड केल्याचा जाब विचारला. तसेच त्यापाठोपाठ पगारे यांना साडी नेसवून भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला राग व्यक्त केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्याबाबत असा घृणास्पद प्रकार आम्ही अजिबात सहन करणार नाही अशा शब्दांत भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
…हा प्रकार म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न – काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे
72 वर्षे वय असलेल्या प्रकाश (मामा) पगारे या काँग्रेस पदाधिकाऱ्याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. तसेच हा केवळ मामा पगारे यांचा नव्हे तर भाजपने समस्त बहुजन समाजाचा अपमान केला असून आम्ही सर्व जण पगारे यांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आम्ही सर्व जण कल्याण डिसीपी अतुल झेंडे यांचीही भेट घेणार असून याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले.
तर आपल्या पोस्टविरोधात भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजे होती. अशाप्रकारे आपला अपमान करण्याचा यांना हा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित करत आपण याविरोधात लढणार असल्याचे प्रकाश (मामा) पगारे यांनी यावेळी स्पष्ट केले.