
कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी युवासेनेत नवे नेतृत्व
कल्याण, दि. १५ ऑक्टोबर :
शिवसेनेतील “युवासेना लोकसभा अध्यक्षपदी (कल्याण पश्चिम, मुरबाड) प्रतीक पेणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार पेणकर यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. (Prateek Penkar appointed as Shiv Sena’s “Yuva Sena Lok Sabha President”)
युवासेना प्रदेशाध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या प्रमूख उपस्थितीत पेणकर यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि शिकवण आत्मसात करून पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम कराल असा विश्वास युवासेना नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
तर आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊन पक्ष कार्याचा विस्तार आणि तरुण पिढीला संघटनेत सक्रियपणे जोडण्यासाठी आपण १०० टक्के प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया या नियुक्तीनंतर प्रतीक पेणकर यांनी दिली आहे.
कल्याण पश्चिमेतील युवा नेतृत्व अशी ओळख असलेल्या प्रतीक पेणकर यांच्या राजकीय कारकिर्दीला या नव्या जबाबदारीपासून प्रारंभ झाला आहे. पेणकर हे उच्चशिक्षित असून त्यांनी एमबीएची पदवी घेतली आहे. युवासेनेमध्ये मिळालेल्या या नव्या पदाबद्दल प्रतिक पेणकर यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.