
डोंबिवली, दि. 31 जुलै :
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्या आंदोलनाला यश आले आहे.या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी केडीएमसी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. तर या प्रश्नावर केडीएमसी आयुक्तांयाच्या दालनात चर्चेदरम्यान लेखी आश्वासनावरून झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळतणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन्ही पक्षांनी नंतर सामंजस्याची भूमिका घेतल्याने त्या वादावर तिकडेच पडदा पडला. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’s protest against hawkers is a success: Written assurance of action from KDMC administration)
रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील फेरीवाले हटवावेत, हा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी हे सलग दुसऱ्यांदा हे उपोषण सुरू केले होते. स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि चालताना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, फेरीवाल्यांचे पुनर्वसन निश्चित करून देण्यात आलेल्या ठिकाणी करावे, फेरीवाला हटाव पथक तयार करून स्टेशन परिसर फेरीवालामुक्त क्षेत्र घोषित करावे आणि त्याचे फलकही लावण्याच्या मागण्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आल्या होत्या.
दरम्यान शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्या आंदोलनाला दहा दिवस उलटून गेल्यानंतर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांना शिष्टमंडळासह काल सायंकाळी चर्चेसाठी बोलवले होते. त्यावेळी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. मात्र आयुक्त गोयल यांनी त्याला नकार दिल्याने तसेच त्याचवेळी दोन्हीकडून शाब्दिक चकमक घडल्याने बैठकीदरम्यान काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आयुक्तांच्या नकारानंतर बैठक अर्धवट सोडून या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या दालनाबाहेर येऊन ठिय्या मांडला. मात्र काही वेळाने आयुक्त अभिनव गोयल यांनी लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शवल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे शिष्टमंडळ पुन्हा आयुक्तांशी चर्चा करण्यास आत गेले.
त्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर येत्या दोन-तीन दिवसांत कारवाई करण्याचे लेखी मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी शहर प्रमुख अभिजीत सावंत, माजी महापौर आरती मोकल, कल्याणचे माजी शहर प्रमुख सचिन बासरे, अनिता दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.