
कल्याण पूर्वेत भाजपच्या रेखा चौधरी तर डोंबिवली पूर्वेत आसावरी नवरे बिनविरोध
कल्याण डोंबिवली दि.31 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आणि निकाल येण्यापूर्वीच भाजपने आपली विजयाची घोडदौड सुरू केली आहे. कल्याण पूर्वेतून रेखा चौधरी तर डोंबिवली पूर्वेतून आसावरी नवरे या दोन्ही महिला उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित झाल्याने या दोन्ही उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. (Special Wishes from Chief Minister Devendra Fadnavis to Both Women Candidates)
कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 18 अ (कचोरे, नेतीवली टेकडी, गावदेवी ,नेतेवली- मेट्रोमॉल, शास्त्रीनगर,) या प्रभागातील माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी आणि डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 26 क (म्हात्रे नगर ,राजाजी पथ,रामनगर, शिव मार्केट, सावरकर रोड) प्रभागातील आसावरी केदार नवरे दोन्ही पॅनलमध्ये विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.

या दोन्ही महिला उमेदवारांनी पक्षाच्या झालेल्या या विजयी सुरुवातीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दोन्ही महिला उमेदवारांचे अभिनंदन करण्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही गोड बातमी दिली. तसेच दोन्ही महिला उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणेही करून दिले.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शब्दांत रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. “तुम्ही दोघींनी खाते उघडले, पुढे विजय ही विजय है” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उमेदवारांचे कौतुक केले.
























