
दिडशे वेळा रक्तदान करणाऱ्या दिवंगत डॉ. प्रदीप बालिगा यांना शिबिर समर्पित
कल्याण दि. 29 जून :
आपल्या संवेनदशील सामाजिक उपक्रमांसाठी नावलौकिक मिळवलेल्या इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. येथील आयएमए कल्याण सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 300 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे यामध्ये कल्याणमधील अनेक डॉक्टरांनीही स्वतः रक्तदान करीत एक वेगळा आदर्श घालून दिला. (Spontaneous response to Indian Medical Association Kalyan’s blood donation camp; More than 300 blood donors participate)
समाजाभिमुख उपक्रमाद्वारे स्थापनेपासूनच इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणने नागरिकांच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकांपासून आयएमए कल्याणकडून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ज्याला दरवर्षागणिक वाढता प्रतिसाद मिळत असून शेकडो रक्तदाते यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली.
तसेच या रक्तदान शिबिरामध्ये केवळ सामान्य रक्तदातेच नाही तर कल्याणातील अनेक डॉक्टरांनीही स्वतः रक्तदान केले. यंदा प्रथमच हे रक्तदान शिबिर आयएमएच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. तर तब्बल दीडशेहून अधिक वेळा रक्तदान केलेल्या डॉ. प्रदीप बालिगा यांचे नुकतेच निधन झाले. आमच्या प्रत्येक रक्तदान शिबिरात ते हिरीरीने सहभागी व्हायचे ते पाहता यंदाचे हे रक्तदान शिबिर आम्ही डॉ. बालिगा यांना श्रद्धांजली म्हणून अर्पित केल्याची भावनाही डॉ. सुरेखा ईटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. प्रदीप बालिगा यांचा रक्तदानाचा वारसा पुढे चालवणार – डॉ. राजेंद्र लावणकर
डॉ. प्रदीप बालिगा हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी सुरू केलेल्या या रक्तदानाचा वारसा यापुढे आपण चालवणार असल्याची प्रतिक्रिया कल्याण आयएमएचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर यांनी यावेळी व्यक्त केली. आतापर्यंत आपण विविध ठिकाणी 79 वेळा रक्तदान केले असून लोकांनीही रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयमेथॉन 6 च्या टी शर्टचे लॉन्चिंग करण्यात आले. तसेच आयएमए कल्याणच्या डॉक्टर सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, कल्याण बार कौन्सिल असोसिएशनचे खजिनदार ॲड. जयदीप हजारे, केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, आय एम ए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. तन्वी शहा, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर, आयएमएचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. आश्विन कक्कर, सहसचिव राहुल तिवारी, डॉ.दीप्ती दिक्षीत, डॉ.विद्या ठाकुर, डॉ.मनोज वर्मा, डॉ.लीना सोनेकर, डॉ.प्रकाश देशमुख, डॉ.प्रशांत खताळे, डॉ विकास सुरंजे, डॉ.अमित धर्माधिकारी, डॉ.विवेक भोसले, विश्वस्त डॉ.राजन माने, डॉ. संदेश रोठे, डॉ. निता भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.