Home ठळक बातम्या केडीएमसीच्या नोकर भरतीबाबत आयोजित शिवसेनेच्या मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

केडीएमसीच्या नोकर भरतीबाबत आयोजित शिवसेनेच्या मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तज्ञ व्यक्तींकडून करण्यात आले सखोल मार्गदर्शन

कल्याण दि.5 जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये 490 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या नोकरभरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना शहर शाखा आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिराला इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे मागदर्शन शिबिर राबवण्यात आले.
कल्याण पश्चिमेच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात उपनेत्या विजया पोटे, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.

गेल्या महिन्यात 10 जून रोजी केडीएमसी प्रशासनाकडून ही नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी पूर्वी 3 जुलै 2025 ची मुदत देण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांनी केलेल्या विनंतीनुसार यामध्ये वाढ करून आता 15 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे. तर अनेक वर्षांनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे ही नोकरभरती केली जाणार असल्याने याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी साशंकता होती. ती दूर करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शहर शिवसेना शाखेला हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आम्ही हा महत्त्वाचा उपक्रम राबविल्याची माहिती शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

आज झालेल्या या मागदर्शन शिबिरामध्ये शशिकांत बोरसे, पवनकुमार जोगदंडे, प्रशांत खैरनार या तज्ञ व्यक्तींनी नोकर भरतीचा पेपर पॅटर्न, परिक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, सराव पेपर, प्रशिक्षण , वेळेचे नियोजन यासह जीके, जीएस, सीए आणि तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

तर या नोकर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नसून प्रत्येक उमेदवाराच्या मेरिटवरच निवड केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा