
डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
डोंबिवलीच्या जनरल एज्युकेशन सोसायटीच्या ब्लॉसम इंटरनॅशनल (GEI’S Blossom International School, Dombivli ) शाळेमध्ये STEAM exhibition आणि Knowledge Fair 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. आज आणि उद्या अशा दोन दिवसीय या भव्य मेळाव्यात विद्यार्थ्यांनी, सर्जनशीलतेने बनवलेले आपले कृतीशील प्रकल्प आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे सादर केले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन एनईएस रतनाम महाविद्यालय, भांडुप येथील प्रा. राजीव मिश्रा यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास कोल्हटकर , प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तौमर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी भाषा आणि सामाजिक शास्त्र या शैक्षणिक प्रकल्पांसोबतच खेळ, कॉम्पुटर ,संगीत, नृत्य, चित्रकला आणि हस्तकलेच्या विषयातील कल्पकतेने आपले कौशल्य चमकदारपणे प्रदर्शित केले. लहान मुलांच्या रंगतदार आणि निरागस सादरीकरणांनी पालकांना अगदी भावूक केले.
तर इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, गणितीय संकल्पना आणि वैज्ञानिक प्रयोग अत्यंत उत्स्फूर्तपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगातून नवकल्पकता ठळकपणे उमटली.
या ज्ञानसोहळ्याला पालकांनीही उत्स्फूर्तपणे दाद दिली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे प्रकल्पांचे सादरीकरण केले, तर शिक्षकांनी ते मनापासून रेकॉर्ड करून शाळेच्या विविध माध्यमांवर उपलब्ध करून दिले.
या बहुरंगी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांची सादरीकरण कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, कलात्मक जाण, आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वृद्धिंगत झाले. या अविस्मरणीय सोहळ्याने GEI’S Blossom International School ची शैक्षणिक आणि कलात्मक दृष्टी अधिक खुलली असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा हा नवा टप्पा ठळकपणे अधोरेखित झाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे.