
तब्बल 15 फुटांचा कठडा तोडून डंपर पडला नदीमध्ये
कल्याण दि.20 मे :
कल्याणकारांसाठी आजची सकाळ अतिशय भयानक अशी ठरली. गांधारी पुलावर भरधाव वेगात आलेल्या डंपरने रिक्षाला धडक देऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गांधारी पुलाचा तब्बल 20 फुटापर्यंतचा कठडा तोडून डंपर थेट नदीमध्ये कोसळला. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
सकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही रिक्षा बापगावकडून कल्याणच्या दिशेला येत होती. तर हा ट्रक अतिशय भरधाव वेगाने कल्याणकडून बापगावकडे येत होता. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये डंपरचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला त्याने जोरदार धडक दिली. आणि कोणाला काही कळायच्या आतच पुलाचा कठडा तोडून हा डंपर थेट नदीमध्ये जाऊन कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तर या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. त्यानूसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता समोरचे दृश्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. रिक्षेच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता.
या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकही जखमी झाल्याचे समजते. तर नदीमध्ये पडलेल्या डंपरमध्ये चालकासोबत आणखी कोण होते की नाही याचीही माहिती समजू शकलेली नाही.