Home ठळक बातम्या “जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया संघटनात्मक, सचिन पोटे यांच्यावर पक्षाकडून कोणताही अन्याय नाही” –...

“जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया संघटनात्मक, सचिन पोटे यांच्यावर पक्षाकडून कोणताही अन्याय नाही” – नवी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्याची माहिती

सचिन पोटेंबाबत काँग्रेस पक्षाचे चुकीचे चित्र रंगवण्याचे काम

कल्याण दि.11 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ही पूर्णपणे संघटनात्मक धोरणाचा भाग आहे. इतक्या वर्षांत सचिन पोटे यांना युवक काँग्रेस अध्यक्षपासून, केडीएमसी गटनेता ते 11 वर्ष जिल्हाध्यक्ष पद देण्यात आल्याने यांच्यावर पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नसल्याची माहिती नवी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्याने एलएनएनशी बोलताना दिली. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातील काँग्रेसमध्ये तब्बल 11 वर्षे जिल्हाध्यक्षपद भुषवणारे सचिन पोटे हे एकमेव पदाधिकारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (The change of District President is an internal organizational process, and no injustice has been done to Sachin Pote,” says a senior Congress leader from New Delhi)

निवडणूक काळात जिल्हाध्यक्षसारखे महत्वाचे पद रिक्त राहणे योग्य नाही…
गेल्या महिन्यात सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यासाठी पक्षातील कोणत्याही नेत्याकडून किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे देशभरातील काँग्रेस संघटनेतील पाच वर्षापेक्षा जास्त कोणत्या ना कोणत्या पदावर राहणाऱ्या व्यक्तींच्या बदलाची संघटनात्मक प्रक्रिया सुरू आहे. तसेच पोटे यांचा राजीनामा या प्रक्रियेनुसारच असून त्यामुळे रिक्त झालेल्या जागी राजा पाटकर यांची करण्यात आलेली नियुक्ती हा त्याच प्रक्रियेचा भाग असल्याचेही या वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. तर निवडणूक काळामध्ये जिल्हाध्यक्षा सारखे महत्त्वाचे पद रिक्त राहणे हे चुकीचे ठरले असते. त्यामुळें या रिक्त झालेल्या जागी तात्काळ राजा पाटकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही या वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पाटकर हे सत्ता सोडून काँग्रेसमध्ये आलेले नेते…
देशातील सत्ताकारणाचा विचार करता आज वेगवेगळ्या विरोधी पक्षातून अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हे सत्ताधारी पक्षामध्ये गेले आहेत. मात्र सत्ताधारी पक्षातून काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य असून राजा पाटकर हे त्यापैकीच एक असून याकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून त्यांची कोणत्याही प्रकारे बोळवण नाही…
तसेच एखाद्या व्यक्तीने पक्षातील एखाद्या पदावरून राजीनामा देणे म्हणजे काही त्याच्यावर अन्याय झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. आधीच्या पदाऐवजी पक्षाकडून त्याच्यावर एखाद्या मोठ्या जबाबदारी किंवा पदाची धुराही सोपवली जाऊ शकते. त्यानुसार सचिन पोटे यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख हे महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. या पदालाही मोठे महत्व असून काँग्रेस पक्षाकडून त्यांची कोणत्याही प्रकारे बोळवण करण्यात आल्याच्या वृत्ताचाही या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट शब्दांत इन्कार केला.

प्रामाणिक काम आणि पक्षावरील निष्ठा पाहता त्यांना यापुढेही महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळणार …
तर गेल्या दोन दशकांच्या कार्यकाळात सचिन पोटे यांना पक्षाकडून जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपासून ते कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेता अशी अनेक पदे देण्यात आली आहेत. त्यांचा विचार करता पक्षाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय करण्यात आला नसून तशा पद्धतीचे चित्र रंगवणे हे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रियाही त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. तर सचिन पोटे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद जरी सोडले असले तरी पक्षासाठी त्यांनी केलेलं प्रामाणिक काम आणि पक्षावरील निष्ठा पाहता त्यांना पक्षाकडून यापुढेही महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात येईल असा विश्वासही या वरिष्ठ नेत्याने यावेळी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा