
कल्याण पश्चिमेत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे टिकास्त्र
कल्याण दि.21 डिसेंबर :
आज जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीमध्ये लोकांनी हे दाखवून दिले की असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा भगवा डौलाने फडकला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही महायुतीचाच महापौर बसणार असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (“The people have shown today which is the real Shiv Sena and which is the fake Shiv Sena,” said Deputy Chief Minister Eknath Shinde)
कल्याण पश्चिमेतील अनंत रेसिडेन्सी परिसरात झालेल्या कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आजच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या मोठ्या विजयाबाबत आभार मानतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला.
एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने सुरू झालेली त्यांची पोटदुखी काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. त्यांच्याकडून सतत आपल्यावर टिका केली जात असली तरी आजच्या निवडणूक निकालाद्वारे लोकांनी त्यांना आपली जागा दाखवून दिली. काही लोकं म्हणत होते की शिवसेना पक्षाचे केवळ ठाणे आणि एमएमआर रिजनमध्येच अस्तित्व आहे. मात्र आजच्या निवडणूक निकालांनी दाखवून दिले की चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्या पक्षाला लोकांची पसंती मिळाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तसेच दुसऱ्याची रेष पुसून आपली रेष मोठी होत नाही, त्यासाठी तुमच्या कामाची रेष मोठी करावी लागेल, तुम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल, त्यांना मदत करावी लागेल तरच जनता तुम्हाला न्याय देईल असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महापालिका निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकणार…
आधी लोकसभा मग विधानसभा आणि आता नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही, त्यांनी अजिबात नाराज होऊ नये कारण त्यांच्यासाठी नगरसेवकपदापेक्षा मोठी शासनाच्या अनेक महामंडळ आणि संस्थांमध्ये विविध पदे असल्याचे सांगितले.


























