
5-6 प्रवासी किरकोळ जखमी तर वाहकाला मुकामार
कल्याण दि.7 सप्टेंबर :
कल्याण एसटी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाहीत तोच आज सकाळी पुन्हा एकदा बसचा स्टेअरिंग रॉड तुटून अपघाता झाला. यावेळीही बस झाडाला धडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एसटी प्रशासन मोठ्या जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
आज सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे 20- 25 प्रवाशांना घेऊन माळशेज मार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मात्र मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली. आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. ज्यामध्ये बसच्या उजव्या भागाचे काही नुकसान झाले आणि बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर वाहकालाही मुकामार लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र सुदैवाने ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. काही अंतरावर पुढे असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असता तर मग काहीही होऊ शकले असते. तर या अपघाताबाबत कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही.
दरम्यान काही आठवड्यांपूर्वीही कल्याण एसटी आगाराच्या बसचे पुढचे चाक निखळून अपघाता झाला होता. त्यापाठोपाठ आता आज स्टेअरिंग रॉड तुटून झालेला अपघाताचा विचार करता कल्याण आगारातील बसेसच्या देभभाल दुरुस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देखभाल दुरुस्तीचे काम करूनही असे अपघात होत का आहेत ? की बसेसच्या देखभाल दुरुस्ती कामामध्ये काही तडजोड केली जात आहे का? आणखी किती मोठा अपघात झाल्यावर की प्रवाशांचा बळी गेल्यावर एसटी प्रशासन जागे होणार आहे असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.