
कल्याण दि.21 ऑगस्ट :
वाहनांच्या लांबलचक रांगा, कर्णकर्कश्श हॉर्नचे आवाज आणि त्यातून होणारे ध्वनी तसेच वायू प्रदूषणामुळे शहराचा श्वास कोंडला आणि त्यात नागरिक अक्षरशः गुदमरून गेले. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीला कारणीभूत तसे अनेक घटक असले तरी निमित्त ठरले ते आज सकाळपासून प्रेम ऑटो ते शहाड मार्गावर झालेली वाहतूक कोंडी. (Unprecedented traffic congestion chokes the breath of welfare; Citizens are fed up with congestion on main and internal roads)
कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसागणिक अतिशय गंभीर होत चालला असून आज तर या वाहतूक कोंडीने शहराचा बहुतांश भाग कोंडल्याचे दिसून आले. मुख्य असो की अंतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी वाहनांच्या एकामागोमाग एक लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज दुपारी साधारणपणे 12 वाजण्याच्या सुमारास प्रेम ऑटो ते शहाडकडे जाणाऱ्या मार्गावर अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. आणि पुढील अवघ्या काही वेळातच या संथगती वाहतुकीचे अतिशय भयानक अशा वाहतूक कोंडीमध्ये रूपांतर झाले. प्रेम ऑटो ते शहाड ते उल्हासनगर अशा अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासाला तब्बल 2-2 तास लागत आहेत यावरूनच या भयानक वाहतूक कोंडीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
बरं या मार्गावरील ही वाहतूक कोंडी याच परिसरपुरता मर्यादित राहिली असती तर ठीक. मात्र तसे न होता हळूहळू मुरबाड रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक,वालधुनी पूल परिसर, रामबाग, सहजानंद चौक, बिर्ला कॉलेज मार्ग, चिकण घर मुख्य चौक आणि आसपासच्या परिसरात त्याचे लोण पसरले. आणि ही कोंडी फुटेपर्यंत मग शाळा सुटण्याची वेळ झाली. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, आग्रा रोड, लालचौकी, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, बाजारपेठ या परिसरात आता वाहतूक कोंडी झाली आहे. प्रमुख मार्ग वाहतूक कोंडीने विस्कळीत झाल्याने मग वाहन चालकांनी अंतर्गत भागातील रस्त्यांकडे आपला मोर्चा वळवला आणि मग हे अंतर्गत मार्गही आता वाहनांनी तुडुंब भरले आहेत.
आजच्या साध्या दिवशी झालेली ही वाहतुकीची दयनीय परिस्थिती पाहता आगामी गणेशोत्सव काळात शहरात काय होईल याचा विचार करूनही डोकं चक्रावून सुटत आहे. तर ही वाहतूक कोंडीची समस्या कोण, कशी आणि कधी सोडविणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.