Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीणमध्ये पारंपरिक ढंगात साजरा झाला ‘जागतिक आदिवासी दिन’

कल्याण ग्रामीणमध्ये पारंपरिक ढंगात साजरा झाला ‘जागतिक आदिवासी दिन’

 

कल्याण दि.9 ऑगस्ट :
आज असलेला जागतिक आदिवासी दिन कल्याण ग्रामीणच्या वाघेरे पाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांकडून आदिवासींच्या हक्क आणि परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. (‘World Tribal Day’ celebrated in traditional manner in Kalyan Rural)

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी “आदिवासी संस्कृती जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असून आदिवासींचे हक्क हे मानवी हक्क आहेत” या विषयावर सविस्तर विचार मांडले. तसेच आदिवासींच्या इतिहास, संघर्ष आणि आजच्या काळातील आव्हानांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.

यानंतर ग्रामस्थ महिलांनी पारंपरिक रंगतदार तारपा नृत्य सादर करून कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली. सहभागी महिलांचे पारंपरिक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नृत्याच्या तालावर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा शिंगाडे, शिक्षिका अरुणा भोये, ग्रामपंचायत सदस्य भारती भगत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद्मा शिद, अंगणवाडी सेविका अंजना कडव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांचे विशेष योगदान लाभले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकात्मता, परंपरा आणि हक्क संवर्धनाचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा