Home ठळक बातम्या रुख्मिणीबाईतील महिलेचा मृत्यू; सिस्टर इन चार्जसह तिघे ड्रायव्हर निलंबित तर वैद्यकीय अधिकारी...

रुख्मिणीबाईतील महिलेचा मृत्यू; सिस्टर इन चार्जसह तिघे ड्रायव्हर निलंबित तर वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला केले सेवेतून कमी

केडीएमसी आयुक्तांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची कारवाई

कल्याण दि.7 मे :
कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दिनांक दोन दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या अँब्युलन्सअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वाहनचालकांवर अतिशय कठोर कारवाई केली आहे. (Woman dies in Rukhminibai; Three drivers including sister in charge suspended, medical officer and nurse dismissed)

या महिलेला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले असते तर तिच्यावर आवश्यक ते उपचार योग्य वेळेत मिळून तिचा जीव वाचला असता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने रुग्णालयातील सिस्टर इन चार्ज जयश्री रायकर, वाहन चालक प्रमोद लासूरे, मारुती निकम आणि हरिश्चंद्र यशवंतराव यांच्यावर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बाह्य संस्थेमार्फत नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. उमर पटेल आणि परिचारिका नमिता भोये यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडूनही या घटनेप्रकरणी खुलासा मागवण्यात आला आहे.

अशी घडली होती घटना…
दोन दिवसांपूर्वी 5 मे रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 43 वर्षीय सविता बिराजदार या आपल्या डाव्या हातामध्ये अशक्तपणाची तक्रार घेऊन रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या अपघात कक्षात उपचाराकरीता दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयातील अपघात कक्ष विभागात बाह्यसंस्थेमार्फत नियुक्त असणारे डॉ. उमेर पटेल यांनी त्यांना तपासले असता सेरिब्रो व्हॅस्क्युलर एक्सीडेंटची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी रुग्णालयातील तज्ञ फिजिशियन डॉ.निशिकांत शर्मा यांच्याकडे संदर्भित केले. फिजिशियन डॉ. निशिकांत शर्मा यांनी तपासल्यानंतर सविता यांना केईएम रुग्णालय, मुंबई किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन पुढील उपचाराचा सल्ला दिला होता. त्यानुसार दुपारी 2 वाजता संदर्भ चिट्ठी देण्यात आली होती. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी असलेले शुल्क भरण्याबाबत सूचित केले असता त्यांनी शासनाच्या १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र १०८ क्रमांकावरून मदतीची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अपघात कक्षातील ऑन ड्युटी स्टाफ नर्स कोमल दिघे, नमिता भोये आणि सिस्टर इन्चार्ज जयश्री रायकर यांनी ऑन ड्युटी वाहनचालक यांना दुपारी २.१५ वाजता रुग्णसंदर्भित करण्याबाबत कळवले होते. परंतु प्रत्यक्षात एक तासानंतर म्हणजेच दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली.

मात्र सविता यांना रुग्णवाहिकेत हलवताना त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा अपघात कक्षामध्ये आणण्यात आले. दरम्यान वाहन चालक मारुती निकम ही रुग्णवाहिका घेऊन डिझेल भरण्यासाठी घेऊन गेले. अपघात कक्षामध्ये कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर यांनी रुग्णाला तपासले असता रुग्णाचे पल्स रेट आणि रक्तदाब मोजता येत नव्हता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ Cardiopulmonary Resususcitation चालू केले आणि रुग्णाला Ing. Atropime, Ing.Adrenaline ऑक्सीजन देण्यात आले तरीही रुग्णाचा प्रतिसाद मिळाला नाही. आणि डॉक्टरांनी प्रयत्न करूनही सविता यांचा दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

या प्राथमिक चौकशीमध्ये वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात आली असता रुग्णवाहिका चालक हरिश्चंद्र यशवंतराव, प्रमोद लासुरे यांनी कर्तव्यावर उपस्थित असतानाही रुग्णवाहिकेतून सविता यांना स्थलांतरित करण्यामध्ये दिरंगाई केल्याचे आणि मारुती निकम यांनी रुग्णवाहिका अनावश्यकरित्या डिझेल भरण्यासाठी नेऊन कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच अपघात कक्षातील परिचारिका नमिता भोये, सिस्टर इन्चार्ज जयश्री रायकर यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना सविता यांना स्थलांतरित करण्यात आले नसल्याची माहिती दिली नाही. तसेच डॉ. उमेर पटेल यांनी रुग्णाला स्थलांतरित करण्यासाठी संबंधित वाहनचालक यांच्याकडे पाठपुरावाही केला नाही किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनाही अवगत केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यामूळे सविता यांना वेळेमध्ये स्थलांतरित केले असते तर त्यांना वेळेवर उपचार सुरू झाले असते आणि रुग्णाचा जीव वाचू शकला असता असा निष्कर्षही या चौकशीत काढण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या मान्यतेने ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी आजच सकाळी सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून रुक्मिणीबाई रुग्णालयाचा दौरा करत सर्वांची झाडाझडती घेत आरोग्य सेवेमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद दिली होती. त्याला अवघे काही तासही उलटले नसताना सविता बिराजदार यांच्या मृत्यूप्रकरणी ही कठोर कारवाई करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा