
कल्याण आरटीओ सुसज्ज इमारतीचे लोकार्पण
कल्याण दि.19 मे :
परिवहन विभागाने अधिक गतिमान, लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. कल्याण आरटीओ म्हणजेच उप प्रादेशिक परिवहनच्या कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील सुसज्ज कार्यालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. (Deputy Chief Minister Eknath Shinde expressed his hope that the Transport Department should be more dynamic and people-oriented)
परिवहन विभाग हा राज्याचा कणा आहे. प्रताप सरनाईक यांची या मंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर या विभागाला गती आली आहे. परिवहन आणि प्रादेशिक परिवहन विभाग असे दोन विभाग या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. मात्र एसटीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यामुळे या दोन्ही विभागाची योग्य सांगड घालून आपल्याला पुढे जायचे आहे असे मतही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
तर परिवहन विभागाकडून महसूल हवा असेल तर कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या नवीन कार्यालयातून लोकांना उत्तम सेवा मिळावी यासाठी तुम्ही सर्वजण कामकाज स्मार्ट करत आहात, एआयचा वापर करत आहात, लायसन्स आणि परवाने देताना नवीन यंत्रणा वापरत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र त्यासोबतच लोकांचा वेळ वाचावा, त्यांना ईज ऑफ लिव्हिंग वाटावे, लोकांची कामे त्वरित व्हावीत यासाठी यंत्रणेने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन काम करावे अशी अपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमूख रवी पाटील तसेच परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.