Home क्राइम वॉच कल्याण पूर्व इमारत दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कल्याण पूर्व इमारत दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

चौथ्या मजल्यावरील टाईल्सचे काम ठरले अपघाताला कारणीभूत

कल्याण दि.21 मे :
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा हकनाक बळी गेला असून 6 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये एका दिड वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे.(Kalyan East building accident; Chief Minister Devendra Fadnavis announces Rs 5 lakh assistance to the families of the deceased)

दरम्यान भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही काल रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच घडलेली ही घटना अतिशय गंभीर असून त्यातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले.

कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी सोसायटी या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून ही भीषण दुर्घटना घडली. ज्यामध्ये ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरील शोधकार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

*जखमी व्यक्तींची नावे:*
१: अरुणा रोहिदास गिरनारायण (महिला, ४८ वर्षे) – अमेय हॉस्पिटल
२: यश जितेंद्र क्षीरसागर (मुलगा, १३ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल
३: निखिल खरात (पुरुष, २६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल
४: विनायक मनोज पार्धी (मुलगा, ४.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल
५: श्रावील श्रीकांत शेलार (मुलगा, ४.३ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल
६: श्रद्धा साहू (महिला, १४ वर्षे) – बाई रुक्मिणी हॉस्पिटल

*दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे:*
१: श्रीमती. सुशिला नारायण गुजर (महिला, ७८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल
२: कु.नामस्वी श्रीकांत शेलार (महिला, १.५ वर्षे) – आशिर्वाद हॉस्पिटल
३: श्री. व्यंकट चव्हाण (पुरुष, ३२ वर्षे) – घटनास्थळी
४: श्रीमती सुनिता निरंजन साहू (महिला, ३८ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल
५: श्रीमती. प्रमिला कालीचरण साहू (महिला, ५६ वर्षे) – चैतन्य हॉस्पिटल
६: श्रीमती.सुजाता मनोज पाडी (महिला, ३२ वर्षे) – घटनास्थळी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा