
केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाच्या नमस्ते योजनेचा भाग
कल्याण दि.4 जुलै :
गेल्या काही वर्षांत सिवर – सेप्टिक टँक सफाईचे काम करताना अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासह या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि केडीएमसी प्रशासनातर्फे नमस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी कामा फाऊंडेशनतर्फे सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
गेल्या काही वर्षांत सिवर – सेप्टिक टँक सफाई करताना अनेक अपघात झाले आहेत. ज्यामध्ये काही सफाई कामगारांना आपल्या जीवाला मुकावे लागले असल्याने या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने गांभिर्याने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नमस्ते योजना सुरू करून त्याद्वारे सफाई कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सफाई कर्मचाऱ्यांची ही सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. ज्यामध्ये सिवर – सेप्टिक टँक सफाई करताना कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घ्यावी, कोणती उपकरणे वापरावीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी प्रमुख मुद्द्यांवर या कार्यशाळेत कामा फाऊंडेशनच्या तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती केडीएमसी जनि – मनि विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिली. तसेच या कार्यशाळेला उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना लागू असणारे शासकीय लाभ उपलब्ध करून देण्यासाठीही कार्यवाही केली जाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.