
केडीएमसी आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या कार्यशाळेची रेकॉर्डब्रेक कामगिरी
डोंबिवली दि.12 ऑगस्ट :
सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कल्याण डोंबिवलीतील शालेय विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये तब्बल 4 हजार 657 गणेशमूर्तींची निर्मिती करत नविन रेकॉर्ड रचला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने वै. संतश्रेष्ठ ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडासंकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात या पर्यावरण पुरक श्री गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (4,657 eco-friendly Ganpati Bappas made in Dombivli; Recorded in India and OMG books)
पर्यावरण पुरक म्हणजेच शाडु मातीच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनमानसामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण – प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत आजच्या अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील महापालिकेच्या शाळा, खासगी शाळा, विनाअनुदानीत शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शाडु मातीच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याचा पूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करत नविन इतिहास रचला.
सकाळी 8 वाजल्यापासूनच डोंबिवलीतील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त सभागृह चिमुकल्या मुलांच्या किलबिलाटाने भरुन गेले होते. तर क्षितीज संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनीही यामध्ये हिरीरीने सहभाग घेत आपल्या हातानी अतिशय उत्कृष्ठ अशा श्री गणेशमूर्ती साकारल्या.
ही बच्चे कंपनी अत्यंत तन्मयतेने आणि भान हरपून आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती साकारत होती. ज्याला आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनीही मनापासून कौतुकाची दाद दिली.पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा व्हावा, जास्तीत जास्त नागरीकांनी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती स्थापनेची भावना रुजवावी, म्हणून “हरित बाप्पा, फलित बाप्पा” या संकल्पनेवर आज या कार्यशाळेचे आयोजन आज केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
बच्चे कंपनीने अशी रेकॉर्ड ब्रेक केली कामगिरी…
यापूर्वी बेंगळुरू येथील पोल्यूशन कंट्रोल बोर्डचा 3 हजार 308 पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचा जागतिक विक्रम या कार्यशाळेत मोडीत निघाला. या कार्यशाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या हातानी तब्बल 4 हजार 657 गणेशमूर्ती श्री गणेश मूर्ती साकारल्या. ज्याची इंडिया बुक आणि OMG बुक ऑफ रेकॉड्सने घेतली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् च्या सीमा मन्निकोथ आणि OMG बुक ऑफ रेकॉड्सचे डॉ.दिनेश गुप्ता यांनी हे रेकॉर्ड घोषीत करत केडीएमसी आयुक्तांना त्याची प्रमाणपत्रही सुपूर्द केली.
यावेळी उपस्थित सहभागी विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि शाळांचे शिक्षक मिळून एकुण 5 हजार 245 जणांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. याचीही दखल OMG बुक ऑफ रेकॉड्स यांनी घेतल्याची माहिती या कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख आणि पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, समिर भुमकर, वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा.आयुक्त प्रिती गाडे, हेमा मुंबरकर, राजेश सावंत यांनी उपस्थित राहून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. तसेच मूर्तीकार सचिन गोडांबे, मिनल लेले, शेखर ईश्वाद, संतोष जांभुळकर, गुणेश अडवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता पर्यावरण प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व त्यांच्या विभागातील सहकारी तसेच एज्युकेशन टुडे फांऊडेशनचे भरत मलिक आणि वृंदा भुस्कुटे यांनी अथक परिश्रम घेतले.