
कल्याण दि.14 ऑगस्ट :
केडीएमसी प्रशासनाने 15 ऑगस्टसाठी दिलेल्या मांसविक्री बंदीच्या आदेशावरून मोठा वादंग निर्माण झाला असून कॉंग्रेसही याविषयावर आक्रमक झाली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेत कोंबड्या सोडण्याचा इशारा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे. (Congress aggressive over meat sale ban; threatens to release chickens in municipal corporation if decision is not withdrawn)
15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चिकन मटन विक्री बंदी असल्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून केडीएमसीचा निषेध नोंदवण्यात येतोय. काँग्रेसनेही या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. या निर्णयाला विरोध करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी हा निर्णय म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. केडीएमसीने जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पोल्ट्री फार्मची गाडी आणून कोंबड्या सोडू असा इशारा पोट यांनी प्रशासनाला दिला आहे.
मनसेही याप्रकरणी आक्रमक….
तर या निर्णयावर मनसे देखील आक्रमक झाली असून असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका, मटण चिकन जप्त करून अभिनव पोल्ट्री फार्म उभारणार का ? असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी उपस्थित करत वेळ वाया घालवू नका कल्याण डोंबिवली मध्ये पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याकडे लक्ष द्या असा सल्ला घरत यांनी दिला आहे.