
ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातर्फे वृक्षारोपण, तिरंगा फेरी आणि स्वच्छता अभियान
कल्याण दि.14 ऑगस्ट :
उद्या असलेल्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केडीएमसीच्या ड प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या पुढाकाराने कल्याण पूर्वमध्ये तीन वेगवगेळे सामाजिक उपक्रम राबवून अनोखे असे तिरंगी अभिवादन करण्यात आले. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड, उपआयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, माजी नगरसेवक मनोज राय यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. (Unique “Tricolor Greetings” from KDMC in Kalyan East on Independence Day)
उद्याच्या स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण देशभरासह कल्याण डोंबिवलीमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. विविध सामाजिक संस्थांसह केडीएमसी प्रशासनातर्फे अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याचनिमिताने केडीएमसीच्या ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून कल्याण पूर्वेतील 60 फुटी रस्ता परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि वेस्टर्न रिजन स्कूल परिसरात आयुक्त अभिनव गोयल, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 1 हजार विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जिरे टोप चौक, चिंचपाडा रस्ता, काटेमानिवली चौकापासून ड प्रभाग कार्यालयापर्यंत हर घर तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी 100 फूट लांब राष्ट्रध्वजही आणला होता. यावेळी मॉडेल कॉलेज, साकेत कॉलेज, कमलादेवी कॉलेजसह सहयोग सामाजिक संस्था, जाणीव सामाजिक संस्था, केम्प्वा यांचेसह सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील संस्थांचे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ज्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला त्या किल्ल्यांच्या भव्य आणि सुंदर प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. केडीएमसी ड प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या सहाय्याने द्वारका विद्यामंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांनी ही शिवरायांच्या किल्ल्यांची ही हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियानाने वेधले लक्ष…
या उपक्रमांसोबतच केडीएमसी घनकचरा विभागाच्या वतीने ड प्रभाग क्षेत्र परिसरात “हर घर तिरंगा हर घर स्वच्छता” हे अनोखे जनजागृती अभियान राबवण्यात आले. ज्यामध्ये सुमित एल्कोप्लास्टच्या आयईसी (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन) टीममधील युवा सदस्यांनी अतिशय परिणामकारकपणे स्वच्छतेसोबतच ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व आपल्या पथनाट्यातून उपस्थितांना पटवून दिले. या पथनाट्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनीही कौतुक करत नागरिकांनी कचरा वर्गीकरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
तर नागरिकांनी केवळ उद्यासाठी नाही तर नेहमीच आपल्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवावी असे आवाहन करीत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.