
दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या बोटींग सुविधेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण दि.23 ऑक्टोबर :
कल्याण शहरातील ऐतिहासिक प्रभोधनकार ठाकरे तलाव (शेणाळे तलाव) परिसराच्या सुशोभीकरणामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ देणार नाही. परंतू येत्या नविन वर्षामध्ये नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) वतीने सुरू असलेले या तलावाचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यवृद्धीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, नववर्षात नागरिकांना आणखी आकर्षक सुविधा उपलब्ध होणार आहेत.(Kalyan: No inconvenience during Prabodhankar Thackeray Lake beautification, but more facilities for citizens in the New Year – KDMC)
कल्याणचा मानबिंदू अशी ओळख असलेला हा प्रबोधनकार ठाकरे अर्थातच भगवा तलाव लवकरच नव्या रूपात नागरिकांसमोर सादर होणार असून त्यादृष्टीने या परिसरात जलदगतीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र या तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक आणि काही राजकीय नेत्यांकडून तलावाच्या या सौंदर्यकरणाला विरोध होत आहे. या कामामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट होऊन अस्वच्छता पसरण्याची रास्त भिती या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर महापालिकेकडून भूमिका स्पष्ट करताना असे सांगण्यात आले की मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मतांचा आम्ही नक्कीच आदर करतो. परंतु त्यांच्या जॉगिंग ट्रॅकच्या सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता आणि तलाव परिसराच्या सौंदर्याला कोणताही धक्का न पोहोचवता उर्वरित सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच याठिकाणी संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासह काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून हे सौंदर्यीकरण केले जात असल्याची भूमिका उपआयुक्त संजय जाधव यांनी मांडली आहे.
प्रबोधनकार ठाकरे तलाव परिसरात येत्या काळात नागरिकांना मिळणार या सुविधा…
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेकडून बोटिंग सुविधा, फ्लोटिंग ब्रिज, फाउंटन, कॅफेटेरिया, लेझर शो, तसेच मुलांसाठी खेळण्याची जागा अशी विविध आकर्षणे उभारण्यात येत आहेत. तलावाभोवती व्यायामासाठी पाथवे, जॉगिंग ट्रॅक, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला आहे. इतकेच नाही तर वाराणसी येथे ज्याप्रमाणे बोटीमध्ये बसून गंगा आरती बघण्याची सुविधा आहे. त्याच धर्तीवर याठिकाणी नागरिकांना बोटीत बसून लेझर शो आणि म्युझिकल फाऊंटनचा आनंद घेता येणार आहे.
उपआयुक्त संजय जाधव यांनी सांगितले की, “प्रभोधनकार ठाकरे तलावाचे रूपांतर हे केवळ सौंदर्यवृद्धीपुरते मर्यादित नाही. सर्व वयोगटांसाठी हे ठिकाण पुन्हा जिवंत केले जात आहे. भगवा तलाव सुशोभीकरणामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ देणार नाही, तसेच परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.”
नुकत्याच सुरू झालेल्या बोटिंग सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, सकाळ-संध्याकाळ तलाव परिसरात फिरायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तर शहरातील तरुणाईने सोशल मीडियावर इथल्या बोटिंगच्या रिल्सचा अक्षरशः पाऊस पाडला असून या सुविधेचे जोरदार स्वागत केल्याचे दिसून येत आहे.
सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत तलाव नागरिकांसाठी खुला राहणार आहे. सुमारे २४ एकरांवर पसरलेला या तलावाचा आता नवा, आकर्षक आणि आधुनिक अवतार नागरिकांसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे. तर प्रबोधनकार ठाकरे तलाव परिसरातील या सौंदर्यीकरणामुळे सिटी पार्कनंतर नागरिकांना विरंगुळ्याचा आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार. ज्यातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळण्यासह अनेकांना रोजगाराच्या विविध संधीही नक्कीच उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.