Home ठळक बातम्या शिवसेनेचे भाजपला जशास तसे उत्तर; डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे भाजपला जशास तसे उत्तर; डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे साईनाथ तारेही परतले स्वगृही

कल्याण डोंबिवली दि.10 नोव्हेंबर :
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे – मालवणकर यांनी काल रात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.(Former BJP corporators from Dombivli join Shiv Sena in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde and MP Dr. Shrikant Eknath Shinde)

भाजपच्या माजी नगरसेवकांसोबतच यावेळी भिवंडी उबाठाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

शिवसेना प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
या पक्ष प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास व्यक्त केला. राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, निलेश शिंदे, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप – शिवसेनेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रारंभ…
विशेष म्हणजे एकीकडे भाजप आणि शिवसेनेकडून आगामी महापालिका निवडणुका महायुतीमध्ये लढवण्याची घोषणाबाजी केली जात असली तरी दुसरीकडे मात्र एकमेकांचे नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला कल्याण डोंबिवलीमध्ये सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून काल काही तासही उलटले नसताना भाजपच्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत शिवसेनेनंही भाजपला जशास तसे उत्तर दिल्याचे दिसून आले. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आपणच महापौर देऊ अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली असतानाच आपलाच महापौर बसणार यासाठी शिवसेनेकडूनही दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही 2015 प्रमाणे शिवसेना – भाजप या महायुतीतील मित्र पक्षांभोवती आणि मित्र पक्षांमध्येच पाहायला मिळेल हे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा