
कल्याण-डोंबिवली दि.22 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक आणि राजकारणात दिवसागणिक नविन चित्र निर्माण होत असताना निवडून आल्यापासून गायब असलेल्या आपल्या 4 नगरसेवकांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. “आमचे चारही नगरसेवक आमच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते स्वतः आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून, सध्या ते शिंदे गट आणि मनसेशी संबंधित लोकांच्या ताब्यात असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. तसेच आजच्या दिवसांत त्यांना प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून समोर न आणल्यास पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करू अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी मांडली आहे.
निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 नगरसेवक गायब असल्याबाबत जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, “हे नगरसेवक वारंवार आम्हाला फोन करून आपली व्यथा मांडत आहेत. आम्हाला त्यांच्या इच्छेविरुद्ध तिथे ठेवण्यात आले असल्याचे ते सांगत आहेत. शिंदे गट किंवा मनसेसोबत कोणत्याही प्रकारचा अलायन्स किंवा राजकीय करार करण्याची आमची अजिबात इच्छा नाही.”
या पार्श्वभूमीवर पुढे काय पावले उचलावीत, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. “नगरसेवकांनी स्वतः आमच्याशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात हे नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांना त्वरित प्रसारमाध्यमांसमोर आणावे आणि त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “आज संपूर्ण दिवस आम्ही वाट पाहणार आहोत. आजच जर संबंधित नगरसेवकांना माध्यमांसमोर आणून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही, तर आम्ही सीपी, डीएसपी, एसीपी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात आमच्या नगरसेवकांच्या ‘मिसिंग’ची अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे केडीएमसीच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

























