
डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन आणि डावखर फिल्मचा पुढाकार संयुक्त विद्यमाने आयोजन
कल्याण डोंबिवली दि.31 जानेवारी :
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्जनशीलता आणि कला गुणांना वाव देण्यासाठी कल्याण–डोंबिवली परिसरात भव्य आंतरशालेय विज्ञान, इतिहास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन आणि डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी बेलग्रेव स्टेडियम, रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडले.(Inter-School Science and History Exhibition Concludes in Kalyan–Dombivli; Participation from 45 Schools with Attendance of 25,000 Students)
2014 पासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण 45 शाळांमधील सुमारे 25,000 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन सर्वांसाठी पूर्णतः विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी मोफत बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
यावर्षी विज्ञान प्रदर्शनासोबतच हिस्टोरिकल कॉइन्स आणि हिस्टोरिकल स्टॅम्प पेपर यांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय पोस्टर स्पर्धा देखील घेण्यात आली.
विज्ञान प्रदर्शनात एकूण 80 प्रोजेक्ट्स सादर करण्यात आले. यामध्ये एआय आधारित स्मार्ट सुरक्षा प्रणाली, सोलार ट्रेकिंग सिस्टम, स्मार्ट कचरा वर्गीकरण, हायड्रोजन फ्युएल सेल, स्वयंचलित रोप पाणीपुरवठा, प्लास्टिक ते इंधन संकल्पना, पायजोइलेक्ट्रिक फूट स्टेप पॉवर जनरेटर यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश होता.
पोस्टर स्पर्धेसाठी हवामान बदल, एआय – रोबोटिक्स, चंद्रयान-3 मोहीम, पाणी वाचवा जीवन जगवा, प्लास्टिक प्रदूषण जनजागृती, मानवी मेंदू, हेल्दी फूड विरुद्ध जंक फूड, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सौरमंडळ असे विविध विषय देण्यात आले होते.
ही स्पर्धा इयत्ता 5 ते 7 आणि इयत्ता 8 ते 10 अशा दोन गटांत घेण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात 5 ते 7 वी गटात ओमकार इंग्लिश स्कूल आणि डॉन बॉस्को स्कूल यांनी प्रथम क्रमांक विभागून मिळवला, तर ओमकार केंब्रिज स्कूल द्वितीय आणि गणेश विद्यालय तृतीय ठरले.
8 ते 10 वी गटात रतनबुवा पाटील विद्यालय प्रथम, शंकरा विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल द्वितीय (विभागून) तर **सेंट जॉन स्कूल तृतीय ठरले.
पोस्टर स्पर्धेत 5 ते 7 वी गटात गणेश विद्या मंदिर, शंकरा विद्यालय,न्यू श्री वाणी विद्यालय यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. 8 ते 10 वी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल, बी. टी. गायकवाड इंग्लिश स्कूलआणि सेंट जॉन स्कूल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच बेस्ट प्रेझेंटर पुरस्काराने गणेश विद्यालयचा अनुज काटले आणि नूतन ज्ञान मंदिरची काव्या तुपे यांना गौरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना रोख पारितोषिके, पदके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. विज्ञान व इतिहास विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

























