
कल्याण, दि. २८ एप्रिल :
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध Harvard University अंतर्गत कार्यरत Harvard Kennedy School (HKS) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “Strategies for Inclusive Growth” या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड झाली आहे. खा.डॉ. शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली असून जगविख्यात विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी झालेली त्यांची ही निवड म्हणजे एक मानाचा तुरा समजला जात आहे. (Feather in the Cap: MP Dr. Shrikant Shinde Selected for Harvard Kennedy School’s “Strategies for Inclusive Growth” Program) ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय्य आणि सर्वसमावेशक विकासाची दिशा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी मानली जात आहे.
काय आहे “Strategies for Inclusive Growth” कार्यक्रम?…
हार्वर्ड केनेडी स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम जागतिक स्तरावर धोरणनिर्माते, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संशोधक यांना एकत्र आणतो. या कार्यक्रमात पुढील मुद्द्यांवर विशेष भर दिला जातो :
* आर्थिक वाढ सर्व समाजघटकांपर्यंत कशी पोहोचवावी
* रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि कौशल्यविकास यामधील दरी कशी कमी करावी
* महिला, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी प्रभावी धोरणे कशी आखावीत
* शाश्वत आणि न्याय्य विकासासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास
* डेटा-आधारित आणि संशोधनाधिष्ठित निर्णयप्रक्रिया
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना जागतिक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, केस स्टडीजवर काम करण्याची आणि विविध देशांतील यशस्वी विकास मॉडेल्स समजून घेण्याची संधी मिळते.
या निवडीबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी मांडली ही भूमिका…
या निवडीबद्दल बोलताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, सर्वसमावेशक विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर त्या प्रगतीचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे होय. विकास काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित न राहता सर्व समाजघटक, सर्व वर्ग आणि प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत समान संधी पोहोचणे आवश्यक आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात आणि मुंबईसारख्या संधींनी परिपूर्ण पण विषमता जाणवणाऱ्या शहरात समावेशक विकास अधिक महत्त्वाचा ठरतो. विशेषतः महिला, युवक आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक विकासासाठी नवे दृष्टिकोन…
हार्वर्डमधील या कार्यक्रमातून मिळणारे आंतरराष्ट्रीय अनुभव, संशोधनाधारित दृष्टिकोन आणि नवकल्पना यांचा उपयोग करून मुंबई, महाराष्ट्र आणि विशेषतः कल्याण मतदारसंघात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “रस्ते, इमारती आणि आकडेवारी यापलीकडे जाऊन शिक्षण, रोजगार, आरोग्य, सन्मान आणि सुरक्षित भविष्य प्रत्येकाच्या दाराशी पोहोचवणे म्हणजेच खरा विकास,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यापूर्वीही ऑपरेशन सिंदूरनंतर स्थापन झालेल्या शिष्टमंडळाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन प्रभावीपणे भारताची भूमिका मांडली होती. त्यापाठोपाठ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्येही खा.डॉ. शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानंतर आता या जगविख्यात विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी झालेल्या या निवडीमुळे कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासदृष्टीला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळणार आहे.


























