Home ठळक बातम्या आयसीटीसी फाऊंडेशन-केडीएमसीची मान्सून मॅरेथॉन; ‘कॅन्सरमुक्त कल्याण’चा निर्धार, मुसळधार पावसात दीड हजारांहून अधिक...

आयसीटीसी फाऊंडेशन-केडीएमसीची मान्सून मॅरेथॉन; ‘कॅन्सरमुक्त कल्याण’चा निर्धार, मुसळधार पावसात दीड हजारांहून अधिक कल्याणकरांची उत्स्फूर्त धाव

कल्याण | २ ऑगस्ट :
एकीकडे मुसळधार पावसाच्या सरी… अंगावर होणारा जलधारांचा वर्षाव आणि तरीही “कॅन्सरमुक्त कल्याण”चा निर्धार मनाशी बाळगत उत्साहाने धावणारे दीड हजारांहून अधिक नागरिक…कल्याण शहराने रविवारी एक प्रेरणादायी सामाजिक चित्र अनुभवले. इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (ICTC) फाऊंडेशन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कॅन्सरमुक्त कल्याण’ मान्सून मॅरेथॉन २०२६ ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य जनजागृतीचा अनोखा संदेश दिला. (Over 1,500 Kalyankars Defy Heavy Rains in ICTC Foundation-KDMC’s Monsoon Marathon, Pledging a Cancer-Free Kalyan)

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील निसर्गरम्य रिंगरोडवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मान्सून मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. भर पावसातही सहभागींचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. “कॅन्सरविरोधातील लढा ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची चळवळ आहे,” हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले.


यावेळी इंडियन कॅन्सर डे केअर ट्रीटमेंट सेंटरचे प्रमुख कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अमित घाणेकर यांनी सांगितले की, आजच्या घडीला कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र अनेक रुग्ण वेळेवर तपासणी आणि उपचार न घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनते. त्यामुळे नागरिकांमध्ये कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण व्हावी, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटावे आणि वेळेत उपचार घेण्याची सवय लागावी, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी हा आय सी टी सी फाऊंडेशनमार्फत गरजू कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण परिमंडळ ३ पोलीस (डीसीपी) कार्यालय, शहरातील प्रमुख महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक संवेदनशील उद्योजकांनी मोलाचे सहकार्य केले.


३, ५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटांमध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये दीड हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, उद्योजक मच्छिंद्र जाधव, विमल ठक्कर, आयसीटीसी कल्याणचे डॉ. अमित घाणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

“पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आरोग्याचा संदेशही शहरभर पोहोचला आणि ‘कॅन्सरमुक्त कल्याण’च्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले,” अशी भावना यावेळी अनेक सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा