Home ठळक बातम्या महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर नांदिवली तलावाचे ‘डीप क्लीनिंग’; वारकरी समाज, केडीएमसी आणि सुमित...

महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर नांदिवली तलावाचे ‘डीप क्लीनिंग’; वारकरी समाज, केडीएमसी आणि सुमित एल्कोप्लास्टच्या संयुक्त प्रयत्नांना यश

नारळ, निर्माल्य, पूजेचे साहित्य आदी कचरा हटवून तलावाची आतून-बाहेरून स्वच्छता

कल्याण | २४ ऑगस्ट :
कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाच्या स्वच्छतेसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विशेष ‘डीप क्लीनिंग’ मोहीम आज पूर्णत्वास आली. कल्याण शहर वारकरी समाज, स्वच्छ भारत अभियान टीम, केडीएमसीचे सफाई कर्मचारी आणि सुमित एल्कोप्लास्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून तलावाची आतून तसेच बाहेरून व्यापक स्वच्छता करण्यात आली. (Nandivali Lake Undergoes ‘Deep Cleaning’ After a Month-Long Effort; Joint Initiative by Warkari Samaj, KDMC & Sumit Elcoplast Successfully Completed)

गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत तलावाच्या पाण्यात तसेच तलाव परिसरात साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा बाहेर काढण्यात आला. यामध्ये नारळ, पूजेचे साहित्य, निर्माल्य तसेच नागरिकांकडून येता-जाता टाकण्यात आलेला विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. हा संपूर्ण कचरा तलावातून बाहेर काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत कल्याण शहर वारकरी समाजाचे मृत्युंजय शुक्ला यांचा विशेष पुढाकार आणि सातत्यपूर्ण सहभाग राहिला. महिनाभर चाललेल्या या मोहिमेत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेच्या कामाला मोठी चालना दिली. तलाव स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे.

सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान…
तलावातून बाहेर काढण्यात आलेला कचरा परिसरात साठून राहू नये, यासाठी सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांनी कचरा आपल्या वाहनांमध्ये भरून तो योग्य ठिकाणी नेण्याची जबाबदारी पार पाडली. तलावाच्या आतील भागातून तसेच तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातून जमा करण्यात आलेला कचरा वाहून नेण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने सहभाग घेतला. त्यामुळे तलावातील कचरा बाहेर काढण्याबरोबरच त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेलाही हातभार लागला.

महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नांदिवली तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत दिसू लागला आहे. मात्र, तलावाची स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनीही तलावात निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नांदिवली तलावाच्या स्वच्छतेची ही मोहीम ‘स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश अधोरेखित करणारी ठरली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा