
कल्याण | ७ सप्टेंबर :
मैदानावर चपळाई, वेग आणि अचूक डावपेचांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आसनगावच्या जी एम जाधव विद्यालयाने सब-ज्युनिअर आट्या पाट्या जिल्हा स्पर्धेत मुली आणि मुलांच्या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनच्या माध्यमातून रविवारी, ६ सप्टेंबर रोजी कल्याण पश्चिमेच्या नानासाहेब फडके क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. (Double Triumph for Asangaon’s G.M. Jadhav Vidyalaya in Sub-Junior Atya Patya District Championship; Victorious in Both Boys’ and Girls’ Categories)
मुलींच्या गटात जी. एम. जाधव विद्यालयाने अव्वल स्थान मिळवले. लोकमान्य गुरुकुल, डोंबिवलीने द्वितीय तर शिवाई विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, ठाणेने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटातही जी. एम. जाधव विद्यालयाने बाजी मारत विजेतेपद मिळवले. भारतीय सैनिकी विद्यालय, खडवलीने द्वितीय तर सिद्धार्थ विद्यामंदिर माध्यमिक, कल्याणने तृतीय क्रमांक मिळवला.
कल्याणच्या मैदानावर जिल्ह्यातील खेळाडूंची चुरस
स्पर्धेत कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि ठाणे शहरातील विविध शाळा तसेच क्रीडा मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यामुळे दिवसभर क्रीडा संकुलात आट्या पाट्याच्या सामन्यांची रंगत पाहायला मिळाली. खेळाडूंच्या वेगवान हालचाली, अचूक पकडी आणि प्रभावी डावपेचांनी स्पर्धेत चुरस निर्माण झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आर. डी. पाटील तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवलीचे मुख्याध्यापक सुनील कांबळी उपस्थित होते. आट्यापाट्या असोसिएशनचे पदाधिकारी उदय नाईक, लक्ष्मण इंगळे, राजेंद्र शेटे, प्रवीण खाडे, अविनाश नलावडे, सुभाष गायकवाड, आशा परब आणि अंकुर आहेर यांनीही स्पर्धेला विशेष उपस्थिती दर्शवली.

पंच मंडळ आणि निवड समितीची महत्त्वाची भूमिका
स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून कार्यरत असलेल्या पंच मंडळानेही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. पंच मंडळाचे अध्यक्ष मिलिंद धंबा यांच्या नेतृत्वाखाली पंचांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
दरम्यान, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रियाही याच स्पर्धेतून करण्यात आली. आट्या पाट्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुराधा मोरे आणि वैभवी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने मुलींच्या आणि मुलांच्या गटातून प्रत्येकी २५ खेळाडूंची प्राथमिक निवड केली.
निवड झालेल्या खेळाडूंसाठी पुढील काळात विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलींचा १५ आणि मुलांचा १५ खेळाडूंचा अंतिम संघ निश्चित केला जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे सहसचिव एजाज तडवी यांनी दिली.
जी. एम. जाधव विद्यालयाने मुला-मुलींच्या दोन्ही गटांत मिळवलेले हे दुहेरी यश म्हणजे शाळेतील खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीला मिळालेली दाद मानली जात असून, या कामगिरीमुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाच्या खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

























