Home क्राइम वॉच ड्रग्ज तस्करीविरोधात कल्याण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरूच; आणखी एका ड्रग्ज टोळीवर...

ड्रग्ज तस्करीविरोधात कल्याण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरूच; आणखी एका ड्रग्ज टोळीवर मोक्का

34 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अमजद पठाण टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई

कल्याण | १२ सप्टेंबर :
तब्बल 34.18 कोटी रुपयांच्या हेरॉईन जप्तीप्रकरणी कल्याण पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार अमजद युसूफ पठाण याच्यासह त्याच्या चार साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे डीसीपी अतुल झेंडे यांच्या ड्रग्ज तस्करीविरोधातील ‘ऑपरेशन ऑल आऊट उद्देशाअंतर्गत सलग तिसऱ्या ड्रग्ज टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई झाली आहे. (Kalyan Police’s ‘Operation All Out’ Against Drug Trafficking Continues; MCOCA Action Against Another Drug Gang)

या प्रकरणात अमजद पठाण (47), कासिम वसईकर (38), कृष्णा नागप्पा हालेमणी (36), गणेशन जंगम ऊर्फ अण्णा (71) आणि सद्दाम शेख (32) पोलिसांच्या अटकेत असून 1 एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 9.768 किलो हेरॉईन ज्याची अंदाजे किंमत 34.18 कोटी रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ अमजद पठाणच्या माध्यमातून आणणे आणि त्यानंतर त्याचे वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात पठाणचे नेटवर्क केवळ कल्याणपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रासह राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विविध भागांपर्यंत असल्याचेही समोर आल्याचे डी सी पी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.

20 हून अधिक गुन्ह्यांची नोंद..
पोलिसांच्या माहितीनुसार, अमजद पठाणविरोधात महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या तसेच अमली पदार्थांशी संबंधित अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वीही त्याच्यावर 2020 मधील हत्या प्रकरण आणि 2025 मधील ड्रग्ज तस्करी प्रकरणात MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याला ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते आणि एका हत्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता.

पठाण गँग’चे आंतरराज्य नेटवर्क..
दरम्यान अमजद पठाण आणि त्याचे भाऊ बरकत – रहमत हे कल्याणमधून ‘पठाण गँग’च्या माध्यमातून अमली पदार्थांचा आंतरराज्य व्यवसाय चालवत असून या नेटवर्कचे विविध राज्यांमध्ये संपर्क असल्याचे तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संभाव्य संबंध तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातील आरोपी कारागृहात असतानाच त्यांच्याविरोधात MCOCA अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी अमजद पठाण, कासिम वसईकर आणि कृष्णा हालेमणी यांना पुन्हा अटक करण्यात आली. ठाणे येथील विशेष MCOCA न्यायालयाने तिघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न
कल्याण परिमंडळ-3 मध्ये गेल्या वर्षभरात राष्ट्रीय पातळीवर नेटवर्क असलेल्या तीन मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटविरोधात MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संघटित पद्धतीने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणे, त्यांना लवकर जामीन मिळण्याची शक्यता रोखणे आणि त्यांचे आर्थिक – वितरणाचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचेही डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले.

34 कोटींच्या हेरॉईन जप्तीनंतर अमजद पठाण आणि त्याच्या साथीदारांवर झालेली MCOCA कारवाई ही कल्याण परिसरातील संघटित अमली पदार्थ तस्करीविरोधातील पोलिसांची आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा