
सायकलस्वाराच्या मृत्यूनंतर रिंगरोडच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
कल्याण दि.26 मार्च :
कल्याणच्या रिंगरोडवर परवा रात्री रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातात श्रीनिवास तांदळे या सायकलस्वाराला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे रिंगरोडच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराला आज सकाळी कल्याण सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोर्ट सायकलिस्ट ग्रुप, रनर्स ग्रुपचे सदस्य आणि इतर प्रतिष्ठीत नागरिकांनी रिंगरोडवर एकत्र येत श्रद्धांजली वाहण्यात आली. (Citizens Outrage: “How Many More Deaths on Ring Road Before Action Is Taken?”)
श्रीनिवास विजय तांदळे या सायकलस्वाराचा परवा रात्री रिंगरोडवर रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातात हकनाक बळी गेला. या रस्त्याच्या कडेने सायकल घेऊन जाणाऱ्या विजय तांदळे यांना मागून अतिशय वेगमध्ये आलेल्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की विजय तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांमध्ये कल्याणच्या या रिंगरोडवर झालेल्या अपघातांची आणि त्यामध्ये हकनाक मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे फिटनेसप्रेमी कल्याणकरांमध्ये मॉर्निंग वॉक, जॉगिंग, सायकलिंग, योगा आदी उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणारा हा रिंगरोड एकप्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे.
तर विशेषतः इथल्या तरुणाईमध्ये या रस्त्याचे अधिक आकर्षण असून संध्याकाळनंतर शेकडो तरुण तरुणींचे तो हक्काचे ठिकाण बनला आहे. त्यामुळेच धूम स्टाईल बाईक चालवण्यासोबतच रेसिंग ट्रॅकप्रमाणे वेगाने मोठ्या गाड्या चालवण्याची याठिकाणी स्पर्धा लागलेली असते. आणि या स्पर्धेच्या नादामध्ये गाडीवरील नियंत्रण सुटून रिंगरोडवर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांनी गस्त वाढवणे, स्पीड लिमिट, दिशफलक लावणे, ड्रंक आणि ड्राईव्हविरोधात कारवाईसारख्या उपाययोजना तातडीने करणे, रिंगरोडवर अनधिकृत टपऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रिंग रोडवरील वाहतुकीस आणि निष्पाप नागरिकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, उपहारगृह अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आणि स्पीड ब्रेकर उभारणे, अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अशा मागण्या यावेळी उपस्थित सायकलिस्ट, धावपटू आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून करण्यात आल्या.
यावेळी कल्याण सायकलिस्ट ग्रुपचे डॉ. रेहनुमा, संदेश परदेशी, संजय पाटील, बाईक पोर्टचे साहिर, डॉ. प्रशांत पाटील, आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप घाडगे, धावपटू आणि सायकलिस्ट प्रशांत भागवत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


























