
कल्याण दि.28 डिसेंबर :
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहूनही शिवसेना भाजपमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली ओढाताण काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात या वाटाघाटीमध्ये कल्याण पूर्वेसाठी भाजपच्या वाट्याला अवघ्या 7 जागा आल्याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांचा चांगलाच संताप झाला आहे. विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने मतदान होऊनही कल्याण पूर्व भाजपला मिळालेल्या 7 जागा म्हणजे अतिशय अपमानजनक असल्याचे सांगत केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी यावेळी असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी केली. (Dispute Erupts Over 7 Seats in Kalyan East; BJP Workers Protest Outside Kalyan East MLA’s Office)
शिवसेना आणि भाजपमधील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत झालेल्या विजय निर्धार सभेमध्ये दिली होती. मात्र शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याची माहिती दोन्ही पक्षांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.
त्यातच कल्याण पूर्वेच्या वाटेला अवघ्या 7 जागा आल्याची माहिती कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये काल वाऱ्यासारखी पसरली. आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला 80 हजारांच्या घरात मतदान झाले असून ते पाहता 7 जागा म्हणजे आमचा अपमान असल्याची संतप्त भावनाही भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तर भाजपा कार्यकर्त्यांची ही नाराजी आणि युतीबाबत असलेल्या त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीपर्यंत पोहोचवू अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे प्रचार प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी दिली.

























