Home ठळक बातम्या शहराच्या शाश्वत विकासासाठी 7 कलमी मुद्द्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – केडीएमसी आयुक्त...

शहराच्या शाश्वत विकासासाठी 7 कलमी मुद्द्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल

शाश्वत आणि सुरक्षित शहर विषयावर आयोजित चर्चासत्राला गृहसंकुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.8 नोव्हेंबर :
सध्या निसर्गाचा ढासळलेला समतोल आणि बदललेले ऋतुमान पाहता अनेक नैसर्गिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची हीच ती वेळ असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठरविलेल्या 7 कलमी मुद्द्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासाच्या दृष्टीने केडीएमसी प्रशासनाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. कल्याणच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात झालेल्या या चर्चासत्रामध्ये कल्याण डोंबिवलीतील विविध गृहसंकुलांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Effective implementation of the 7-point agenda is essential for the sustainable development of the city – KDMC Commissioner Abhinav Goyal)

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत – यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण ( Rain Water Harvesting), सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले की, “या सात मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी गृहसंकुलांनी त्यांच्या स्तरावर छोट्या छोट्या समित्या गठीत केल्या पाहिजेत. आणि या समित्यांच्या माध्यमातून इतर रहिवाशांमध्ये याबाबत जागरूकता करून प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच या 7 कलमी कार्यक्रमांवर चांगले काम करणाऱ्या सोसायट्यांना केडीएमसीच्या वतीने मालमत्ता करात सूट देण्यासह इतरही फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचेही आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले.

तर “नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो. प्रशासन म्हणून आम्ही आमची जबाबदारी ओळखून या 7 मुद्द्यांवर गांभिर्याने कार्यवाही सुरू केली असून गृहसंकुलांनीही आता त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, घनश्याम नवांगुळ, उपआयुक्त संजय जाधव, विभागीय संचालक भूषण मानकामे, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले. तसेच कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी विषयांवर विक्रम वैद्य, (राजश्री एनवोर्मेन्ट सोल्युशन), संदीप अध्यापक (वॉटर फिल्ड टेक्नॉलॉजीस), सचिन जोशी (एकम इको सोल्युशन ) या तज्ञांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांकडून विविध विषयांवर प्रश्नही विचारण्यात आले.

दरम्यान केडीएमसी प्रशासनाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. तसेच गेल्या 6 महिन्यांपासून केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यामार्फत शहर सौंदर्यीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचेही विशेष कौतुक केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा