
कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता
बदलापूर दि.13 ऑगस्ट :
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे धरण अशी ओळख असलेले बारावी धरण 97 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. बारवी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने ठाणे जिल्ह्याचा वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणाची पाणी साठवण्याची 338.84 दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असून सध्या धरणात 328.80 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. (Good News: Barvi Dam, which quenches the thirst of Thane district, is 97 percent full)
यंदा मे महिन्यापासूनच वरुण राजाने हजेरी लावलेली असल्याने बारवी धरण जुलै महिन्यातच भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या अखेरीस पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने बारवी धरणाचा पाणीसाठा 90 टक्क्यांच्या आसपास येऊन पोहोचला होता. आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरू झाला असून बारवी धरणाच्या कॅचमेट क्षेत्रातही चांगलाच पाऊस पडत आहे.
बारवी धरण क्षेत्रातील 1जूनपासूनच्या पावसाची आकडेवारी पाहिली गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2 हजार 007 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जो गेल्या वर्षीपेक्षा 100 मिलिमीटरने कमीच आहे. मात्र त्यानंतरही हे धरण आता काठोकाठ भरले असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आपोआपच या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाऊन त्यातून विसर्ग सुरू होतो.