Home ठळक बातम्या महत्त्वाचा निर्णय: नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरामध्ये जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी

महत्त्वाचा निर्णय: नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरामध्ये जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढील दहा दिवस निर्णय लागू

कल्याण डोंबिवली दि.19 सप्टेंबर :
भयंकर अशा वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याणकर नागरिकांना आगामी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. कल्याणात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे. (Important decision: Heavy vehicle traffic banned in Kalyan city during Navratri festival)

त्यानुसार येणाऱ्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 पासून जड अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव काळामध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. परिणामी दुर्गाडी चौकातून गोविंदवाडी बायपास मार्गे पत्रीपुलाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येतो. ज्याचा ताण लालचौकी – सहजानंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर येतो आणि कल्याणच्या या प्रमुख मार्गावर मोठी मोठ्या वाहन संख्येमुळे संपूर्ण पश्चिम शहराला वाहतूक कोंडीचा फटका बसतो.

गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीच्या यातना लाखो लोकांनी भोगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी घेतलेला हा मोठ्या वाहनांच्या बंदीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. किमान नवरात्रोत्सव काळात तरी नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा