
साकव – द ब्रीज बिट्विन कॉलेज ॲन्ड कम्युनिटी उपक्रमांतर्गत महाविद्यालचा पुढाकार
कल्याण दि.14 ऑगस्ट :
आपल्या समाजातील एक महत्त्वाचा मात्र दुर्लक्षित घटक असलेल्या आदिवासी समाजाची अद्यापही मुख्य प्रवाहाशी म्हणावी तशी नाळ जोडलेली नाहीये. आजही हा घटक उपेक्षितांचे जगणे जगत असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयाने साकव – द ब्रीज बिट्विन कॉलेज ॲन्ड कम्युनिटी उपक्रमांतर्गत घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून अग्रवाल महाविद्यालयाकडून कल्याणच्या आसपास राहणाऱ्या आदिवासी महिलांना आर्थिक बळ देत आहे. (K.M. Agarwal College’s social mission: Economic empowerment of tribals through ‘Wild Vegetable Festival’)
पावसाळ्यामध्ये निसर्गाचे अतिशय देखणे आणि सुंदर असे रूप आपल्याला पाहायला मिळते. याच निसर्गाकडून पावसाळ्यामध्ये अनेक औषधी आणि आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्वांचा समावेश असलेल्या पालेभाज्या मिळत असतात. कल्याणच्या पाणबुडे नगर, मुरबाड मार्गावरील आणे पाडा आदी वेगवेगळ्या भागांतून आलेल्या आदिवासी महिला आपल्या दृष्टीस पडतात.
परंतु फास्ट फूडच्या काळात या आरोग्यदायी रानभाज्यांकडे काहीही केल्या आपली पाऊले वळत नाही. नेमका हाच धागा पकडून के. एम. अग्रवाल महाविद्यालयाने पुढाकार घेत श्रावणरंग उपक्रमांतर्गत हा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केल्याचे उपप्राचार्य डॉ अनघा राणे यांनी सांगितले. तर केवळ पावसाळ्याच्या काळामध्ये मिळणाऱ्या आरोग्यदायी रानभाज्यांची माहिती आपल्या नव्या पिढीला होण्यासह समाजापासून दुरावलेल्या आदिवासी वर्गालाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जात असल्याचे प्रा.जयश्री शुक्ला यांनी सांगितले.
तसेच या रानभाज्या महोत्सवाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता येत्या काळामध्ये हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. संतोष कुलकर्णी यांनी दिली. तर यंदा थेट नाणेघाटातून आलेल्या लक्ष्मण वाघ या ज्येष्ठ बांबू कलाकाराच्या वस्तूही रानभाज्या महोत्सवामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘साकव उपक्रमाच्या प्रा.सुजाता तिवाले, प्रा.प्रिती सरोदे, रमेश लाड यांनी कातकरी महिलांना बोलते केले अणि त्यांचा कष्टकरी जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला नियामक मंडळ सदस्य प्रा.श्वेता पांडे, डॉ. सुजित सिंग, उपप्राचार्य डॉ. अनघा राणे, उपप्राचार्य डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. रत्ना निंबाळकर, प्रा.प्रशांत मोरे, प्रा. मीनल सोहनी, डॉ.महेंद्र पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.