
कल्याण दि.17 जून :
“शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार” हे ब्रीद उराशी बाळगून गेल्या ९९ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेली कल्याणातील “कल्याण गायन समाज” ही संस्था येत्या १० जुलै रोजी 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. शतकी महोत्सवाच्या या विशेष वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांचे बोधचिन्हही विशेष असे असावे या विचारातून कल्याण गायन समाजाच्या या शतक महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच करण्यात आले.(Kalyan Gayan samaj celebrates its 100th anniversary; Centenary emblem unveiled in the presence of dignitaries)
शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष आणि राज्याचे निवृत्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, गायन समाजाचे पदाधिकारी संदीप जाधव, प्रशांत दांडेकर आदींच्या उपस्थितीत हा अनावरणाचा सोहळा संपन्न झाला.
हे बोधचिन्ह बनवताना वरच्या भागात कल्याण गायन समाजाचा प्रचलित लोगो तसाच ठेवून मध्यभागी या संस्थेची शतकी मजल दाखवणारा शंभर हा आकडा अशा पद्धतीने रेखाटण्यात आलाय की जणू काही १ ते infinity असा भास होतोय. शंभर या आकड्याची एखाद्या कासवासारखी असलेली मांडणी संस्थेचे सातत्य दर्शवते. त्याखाली सुरांच्या लहरींवर स्वार झालेली षड्जापासून निषादापर्यंतची नावे आणि सर्वात शेवटी उत्सवाचे प्रतीक म्हणून पताका असे अर्थपूर्ण आणि देखणे बोधचिन्ह कल्याण गायन समाजाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ आर्टिस्ट राम जोशी यांनी साकारले केले आहे.
या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने गायन, वादन, नृत्याचे अनेक कार्यक्रम, विविध कार्यशाळा, संगीत नाटक अशा विविध कार्यक्रमांचा लाभ संगीत रसिकांना घेता येणार आहे. शताब्दी महोत्सवातील सर्व कार्यक्रमात हेच बोधचिन्ह वापरले जाणार असल्याची माहिती कल्याण गायन समाजातर्फे देण्यात आली.