Home ठळक बातम्या महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लाइफ सायकल अप्रोच’ आवश्यक — आयुक्त अभिनव गोयल

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लाइफ सायकल अप्रोच’ आवश्यक — आयुक्त अभिनव गोयल

ईनरव्हील क्लब ऑफ (झोन 6) “युनाइट अँड ऑरेंज” कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण दि.8 डिसेंबर :
“महिलेच्या जन्मापासून ते तिच्या जीवनाच्या अखेरपर्यंत तिचे सर्वांगीण रक्षण आणि सक्षमीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, युवा , विवाह, कार्यस्थळ, तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रत्येक टप्प्यावर महिलांचे संरक्षण आणि सन्मान अबाधित राखला गेला पाहिजे,” असे सांगत समाजामध्ये महिलांसाठी ‘लाईफ सायकल अप्रोच’ विकसित होण्याची आवश्यकता केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केली. (‘Life Cycle Approach is Essential for Women’s Safety’ — Commissioner Abhinav Goyal)

ईनरव्हील क्लब ऑफ झोन 6 (डिस्ट्रिक्ट 314) महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या “युनाइट अँड ऑरेंज” कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमधील ॲम्फी थिएटर परिसरात झालेल्या या कार्यकमाला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.

महिलांच्या स्वसंरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी केडीएमसी आणि इनर व्हील क्लबच्या संयुक्त प्रयत्नातून या उपक्रमाला गती देण्याचे आवाहन केले. “शासकीय पातळीवर आधीच महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लाइफ सायकल अप्रोच’ राबवला जात असून सामाजिक स्तरावरही तो अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुरुषांचे महिलांवरील वाढते शारीरिक अत्याचार हा वाढता विषय बनलेला असतानाच दुसरीकडे महिलांचेच महिलांवरील मानसिक अत्याचाराकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही असे परखड मत ईनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन “लक्ष्मी सिंग यांनी व्यक्त केले. तसेच महिलांवरील मानसिक अत्याचार हा अतिशय गंभीर विषय असून आपण सर्वांनी त्याला प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.

तर आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला पहिल्याच वेळी आपण सर्व शक्तिनिशी जोरदार प्रतिकार केला तर कोणत्याही व्यक्तीची पुन्हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा शब्दांत खडकपाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक “रुपाली दांगट “यांनी महिलाना आवाहन केले. तसेच सध्या समाजात वेगाने फोफावणाऱ्या महिलांबाबतच्या गुन्ह्यांबाबतही त्यांनी माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.

तर महिलांबाबतचा दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज असून प्रत्येकजण बदलासाठी एक मजबूत आवाज होऊ शकतो. आणि एक आवाज सामाजिक चळवळीची सुरुवात करून त्याद्वारे अनेक आवाज निर्माण करून हे जग बदलू शकतो अशा शब्दात इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. तृप्ती बोबडे यांनी सामाजिक बदलासाठी आवाहन केले.

दरम्यान यावेळी समजात होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधात इनरव्हील क्लबच्या महिलांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच कल्याणातील अमित डान्स क्लासच्या विद्यार्थ्यांनीही महिला अत्याचारासंदर्भात सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संध्या भट, अध्यक्ष डॉ. तृप्ती बोबडे, प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर काजोल खतवानी यांच्यासह कल्याण – डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ हिल्स रिव्हरसाइड आणि कल्याण, डोंबिवली पश्चिम आणि उल्हासनगर, उल्हासनगर पूर्व या इनरव्हील्स क्लबच्या विविध शहरातील महिला सदस्यांनीही विशेष सहकार्य केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा