Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय उलटफेर; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश...

कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय उलटफेर; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे भाजपात जाणार

“यापुढील काळात राष्ट्रीय पातळीवरील पक्षामध्ये काम करणार” असल्याची दिपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया

डोंबिवली दि. 8 नोव्हेंबर :
“राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो” या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय येण्याची चिन्हे आहेत. यावेळी निमित्त आहे ते कल्याण डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशाच्या शक्यतेचे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गणपती दर्शनानिमित्त दिपेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेव्हापासून सुरू झालेल्या दिपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर उद्या अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात दिपेश म्हात्रे यांनीही भाजप पक्षप्रवेशाला दुजोरा दिला असून यापुढील काळात राष्ट्रीय पक्षामध्ये काम करण्याचा मानस असल्याचे एलएनएनशी बोलताना सांगितले. (Major Political Twist in Kalyan-Dombivli; Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) District President Dipesh Mhatre to Join BJP)

कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातील एक युवा तसेच वजनदार नेतृत्व म्हणून दिपेश म्हात्रे यांची ओळख आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर दिपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीतून भाजप विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यामध्ये दिपेश म्हात्रे यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु दिपेश म्हात्रे यांच्याकडे असलेली कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराची राजकीय जाण, अभ्यासू व्यक्तीमत्व, दांडगा जनसंपर्क आणि राजकीय विषय हाताळण्याची हातोटी पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. आणि मग त्यानंतर दिपेश म्हात्रे यांनीही कल्याण डोंबिवलीतील अनेक सामाजिक, नागरी आणि राजकीय प्रश्नांवर अतिशय कल्पकतेने आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना अक्षरशः भांबावून सोडले. इतकेच नाही तर दिपेश म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्याचे कामही केले. ज्यामुळे येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी नव्या आशेने, उमेदीने पाहत होते. या सर्वांच्या मनामध्ये दिपेश म्हात्रे यांनी एकप्रकारे नवअंकुर फुलवले होते, ज्यामुळे या सर्वांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या होत्या.

 

परंतु राजकारणाच्या गर्भामध्ये मात्र नियतीने एक वेगळाच डाव मांडला होता. ज्याची पायभरणी आणि श्रीगणेशाच यंदाच्या गणेशोत्सव काळात झाल्याचे दिसून आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने आपले कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या दिपेश म्हात्रेंची भेट घेतली. ज्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आणि इतके दिवस पडद्याआड चालणाऱ्या दिपेश म्हात्रे यांना भाजपत घेण्याच्या हालचाली – खलबतांना पहिल्यांदा सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. आणि त्याच्या अवघ्या काही आठवड्यांनंतर हा पक्षप्रवेशाचा मुद्दा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला.

“उद्या करणार पक्षप्रवेश, राष्ट्रीय स्तरावरील पक्षात काम करण्याची इच्छा – दिपेश म्हात्रे”

भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेसंदर्भात थेट दीपेश म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. तसेच आतापर्यंत आपण राज्यस्तरीय पक्षांमध्ये काम केले आहे यापुढे आता आपल्याला राष्ट्रीय पक्षांमध्ये काम करायची इच्छा असल्याची प्रतिक्रिया दीपेश म्हात्रे यांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केली. त्यानुसार उद्या सकाळी आपण डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दिपेश म्हात्रे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकारणात मोठे बदल होण्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा