Home ठळक बातम्या दुर्गाडीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळल्याप्रकरणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदाराला घेतले फैलावर

दुर्गाडीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळल्याप्रकरणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदाराला घेतले फैलावर

काम सुरू असताना बुधवारी पहाटे 3 ठिकाणी कोसळली संरक्षक भिंत

कल्याण दि.4 जून :
कल्याण शहराची ओळख आणि ऐतिहासिक ठेवा समजला जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षक भिंतीचा भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे ही संरक्षक भिंत कोसळल्याचे कारण संबंधित ठेकेदाराकडून देण्यात येत असले तरी या कामामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात निकृष्टपणा झाल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदाराला फैलावर घेतले.

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला ही कल्याण शहराची शान आणि प्राचीन वैभव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम केले जात आहे. हे काम सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास या किल्ल्याच्या गोविंदवाडी बायपास दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीचा भला मोठा भाग अचानक कोसळला. ही माहिती मिळताच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आणि जिल्हाप्रमुख अरविंद मोरे या दोघांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्याला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. पाऊस सुरू असतानाही भिंत बांधायचे काम का सुरू ठेवले? एवढ्या मोठ्या प्रमाणात भिंत कोसळली आहे त्यात जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? तसंच येत्या दोन दिवसात असलेल्या बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी मोठी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार ? अशा संतप्त प्रश्नांची सरबत्ती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली. तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांनी या भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यासंदर्भात पी डब्ल्यू डी आणि पुरातत्त्व खातं हे एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तर कंत्राटदार याठिकाणी यायलाही तयार नाहीये. लवकरात लवकर संबंधित ठेकेदार याठिकाणी उपस्थित झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्या कंत्राटदाराला धडा शिकवू असा सज्जड दमही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, कासिफ तानकी, माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनिल खारूक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा