
“कल्याण डोंबिवलीत गरिबांच्या जीवाची ना किंमत ना कोणी वाली”
कल्याण दि.6 मे :
कल्याण डोंबिवलीमध्ये “गरिबांच्या जीवाची न कोणती किंमत आहे ना कोणी वाली आहे” याचा दाखला देणारी आणखी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केवळ रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एका महिलेला रुग्णालयातच आपला जीव गमवावा लागण्याचा प्रकार घडला आहे. आधी कल्याण पूर्व मग डोंबिवली आणि आता कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर यांना रुग्णालय म्हणावे की कत्तलखाने असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण पूर्वेला राहणाऱ्या सविता बिराजदार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले होते. मात्र त्यांची परिस्थिती पाहता डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुक्मिणीबाई रुग्णालयाने त्यांना कळव्याला नेण्याचा सल्ला दिला. परंतू कळव्याला जाण्यासाठी तब्बल 5 तास उलटूनही रुग्णवाहिका न मिळाल्याने रुख्मिणीबाई रुग्णालयातच सविता यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सविता बिराजदार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्याचे केडीएमसी प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे खंडन करून याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन देत आपले सोपस्कार पूर्ण केले आहेत.
केडीएमसीचे दवाखाने नव्हे तर कत्तलखाने…
डॉक्टरअभावी उपचार न झाल्याने मृत्यू होण्यासारखी दुसरी लाजिरवाणी आणखी कोणती गोष्ट असू शकेल? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केवळ रुक्मिणीबाई रुग्णालयच नव्हे तर कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतही काही महिन्यांपूर्वी योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. इतके निष्पाप बळी गेल्यानंतरही इथल्या मुर्दाड आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होत नसेल, तर हे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे अपयश नसून ते गरिबांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल. “कारण जर तुमच्याकडे चांगल्या रुग्णालयात जाण्यासाठी पैसे नाहीयेत तर तुम्ही तसेच तडफडून तडफडून मरा, आम्हाला तुमच्या मरणाशी काहीही देणेघेणे नाही” हाच संदेश या सर्वांच्या कृतीतून दिला जात आहे. आणि असे असेल तर मग केडीएमसीनेही आपल्या या आरोग्य केंद्रांबाहेर दवाखाना आणि रुग्णालयाऐवजी “कत्तलखाना” – इथे मरण मोफत मिळेल अशी पाटी लावण्याची वेळ आली आहे.