Home ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशोदेशी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशोदेशी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे कौतुक

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली शिष्टमंडळ सदस्यांची भेट

नवी दिल्ली दि. 11 जून :
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाने परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या सर्वांनी ज्याप्रकारे भारताचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला ते काम अतिशय अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिष्टमंडळाबद्दल काढले. (Operation Sindoor; Prime Minister Narendra Modi praises Indian delegation that travelled to various countries)

पाकिस्तानच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने त्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन सिंदूरबाबत आणि दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध खासदारांचे शिष्टमंडळ जगातील विविध देशांमध्ये पाठवले होते. ही सर्व शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी भारतात परतल्यानंतर काल या शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली.

यामध्ये भाजपचे बैजयंत पांडा, रविशंकर प्रसाद, जेडीयूचे संजय कुमार झा, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, काँग्रेसचे शशी थरूर, डीएमकेच्या कनिमोजी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या खासदारांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली होती. या प्रत्येक शिष्टमंडळाने जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेबाबतची भूमिका प्रभावीपणे मांडली.

या पार्श्वभूमीवर भारतात परतलेल्या या शिष्टमंडळ आणि त्यातील सर्व सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या परदेश दौऱ्यादरम्यान जगभरातील देशांचा, तिथल्या नागरिकांचा आणि विशेषतः त्यादेशात स्थित भारतीय नागरिकांचाही प्रतिसाद याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांना यावेळी देण्यात आल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यूएई, काँगो लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांचा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात भारताच्या दहशतवादाविरोधातील ठाम आणि स्पष्ट भूमिकेला, तसेच जागतिक शांततेसाठीच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या सर्व राष्ट्रांनी ज्या प्रकारे भरभरून पाठिंबा दर्शविला, त्याबाबतची सविस्तर माहिती आम्ही पंतप्रधान महोदयांना दिल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या प्रयत्नांचे मन:पूर्वक कौतुक केले आणि जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्यासाठीच्या त्यांच्या दूरदर्शी आणि प्रेरणादायी दृष्टिकोनाबाबत आमच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणादायी शब्दांनी देशहितासाठी अधिक निष्ठेने आणि जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळाल्याची भावनाही या भेटीनंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा