
केडीएमसी आयुक्तांची भेट घेत केल्या विविध सूचना
कल्याण दि.27 मे :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी पाहणी करत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपत्कालीन परिस्थितीबाबत विविध सूचनाही केल्या.(Review of drain cleaning work in Kalyan West by MP Suresh (Balya Mama) Mhatre)
सध्या मान्सूनपूर्व पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली असली तरी मुख्य पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कल्याण पश्चिमेतील चार प्रमुख मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामाची आज पाहणी केली. ही पाहणी करून मग त्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत चर्चा केली. ज्यामध्ये येत्या काळात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासनाकडून कशाप्रकारे उपाय योजना केल्या जाणार, महापालिकेची तयारी काय आहे? नालेसफाई किती झालेली आहे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संकटात अडकलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला मदत मागवण्यासाठी महापालिका अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाचे फोन नंबर जारी केल्यास संबंधितांना तत्काळ मदत पोहोचवणे शक्य होईल अशी सूचनाही खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी यावेळी केडीएमसी आयुक्त गोयल यांना केली. त्यावर केडीएमसी आयुक्त गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून हेल्पलाईन नंबर लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचनाही केल्याचे दिसून आले.
दरम्यान खासदार सुरेश म्हात्रे यांनी आपल्या भेटीमध्ये दुर्गाडी चौकाजवळील, अंबिका नगर, जरीमरी आदी महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी केली. याठिकाणी नालेसफाईचे काम सुरू असले तरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास केडीएमसी प्रशासन त्यावर कशाप्रकारे व्यवस्थापन आणि उपाय योजना करते हे त्याचवेळी दिसून येईल असेही खा. म्हात्रे यांनी सांगितले.