
मुरबाड दि.16 जून :
आजचा शाळेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय धूमधडाक्यात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उंबरवाडी शाळेमध्ये अतिशय आगळ्या वेगळया पद्धतीने हा प्रवेशोत्सव साजरा झाल्याचे दिसून आले. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. (School chale hum; A unique school entrance ceremony for children, with a procession in a bullock cart)
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिक्षणाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खास करणे. मिरवणुकीनंतर शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत फुलं, गोड खाऊ आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मुलांना आणि पालकांना प्रेरित केले.
या उपक्रमामुळे गावात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शाळा ही भीती नव्हे तर आनंदाची जागा आहे असे शाळेचे शिक्षक अंकुश लहारे यांनी आवर्जून सांगितलं. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. तर दिनेश टेंभे यांनी सर्वांचे आभार मानत उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
तर या अनोख्या स्वागत सोहळ्याने या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.
माहिती सौजन्य : विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते