
कल्याण, दि. १४ सप्टेंबर :
इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने “करियरच्या उंबरठ्यावर” हा विशेष कार्यक्रम कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. (Students’ enthusiastic response to Kalyan IMA’s “Career Threshold” program)
या कार्यक्रमास केडीएमसीचे आयुक्त डॉ. अभिनव गोयल, उपायुक्त डॉ. संजय जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शिक्षण अभ्यासक बिपीन पोटे, खर्डीकर, वाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याणमधील पंधरा शाळांमधून सुमारे ७५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. आयएमए कल्याण च्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांना आयएमए च्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली आणि प्रतिसादाबद्दल आभार प्रदर्शन केले.इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंडस् च्या अध्यक्षा डॉ तृप्ती बोबडे यांनी प्रास्ताविक मांडले.
केडीएमसीचे आयुक्त डॉ. अभिनव गोयल यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीसंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान या कार्यक्रमामध्ये स्वानंद क्रिएशन फाउंडेशनतर्फे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअर निवडताना निर्माण होणाऱ्या संघर्षावर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. फेबियन अल्मेडा, समुपदेशक श्वेता खांडकर आणि उमा शहा यांनीही विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमाचे पालक वर्गाकडून मोठे कौतुक होत आहे.