Home ठळक बातम्या गरुडझेप : शहापूरच्या छोट्याशा गावातील शेतकऱ्याची लेक झाली थेट “इस्रोमध्ये सायंटिस्ट”

गरुडझेप : शहापूरच्या छोट्याशा गावातील शेतकऱ्याची लेक झाली थेट “इस्रोमध्ये सायंटिस्ट”

ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

शहापूर दि.4 जून :
“स्वप्नं ती नाहीत जी तुम्हाला झोपल्यानंतर दिसतात, तर स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपच देत नाहीत” भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे प्रेरणादायी विचार. ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या लेकीने हे विचार अगदी तंतोतंत सत्यात उतरवत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. सुजाता रामचंद्र मडके असे या मुलीचे नाव असून शेतकऱ्याची लेक ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणेजच इस्रो (ISRO) मध्ये सायंटिस्ट अशी गरुडझेप घेतली आहे. (The daughter of a farmer from a small village in Shahapur became a “scientist in ISRO”)

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगांव या लहानशा खेडेगावात सुजाताचा जन्म झाला. हे गाव शहापूरपासून १५ किलोमीटर अंतरांवर असून तिचे प्राथमिक शिक्षण याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. विशेष म्हणजे ही शाळा १९३६ साली स्थापन झाली असून याच शाळेत सुजाताचे आजोबा जिवा मडके, वडील रामचंद्र मडके यांचेही शिक्षण झाले. त्यानंतर वडिलांनी ठाणे जिल्हा परिषदेमध्ये लिपिक म्हणून नोकरी करत आपला शेती व्यवसाय संभाळत त्यातून मिळलेल्या आर्थिक उत्पन्नातुन तीन मुली एक मुलगा अशा चौघांचे उच्च शिक्षण पूर्ण केले.

सुजाताच्या दोन्ही बहिणी आणि एक भाऊ मोठ्या कंपनीत नोकरी करीत आहे. तर दुसरीकडे लहानशा गावातील सुजाताची ही गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे. सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर काम केल्यानंतर सुजाता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता २७ मे रोजी रुजू झाली आहे.

सूजाताचे वडील रामचंद्र मडके यांनी सांगितले की माझी मुलगी सुजाता महाराष्ट्र सोडून पहिल्यांदा हैद्राबाद येथे शिक्षणसासाठी बाहेर गेली होती. तिच्या अभ्यासाची मेहनत पाहता आरटीओमध्ये नोकरी करत असतानाच इस्रोच्या अभ्यासक्रमासाठी तिने रात्रंदिवस मेहनत घेतली. आजही अभ्यासासाठी घेतलेली तब्बल दोन पोती पुस्तकं घरात जपून ठेवली आहे. विशेष म्हणजे माझ्या मुलीच्या हातून देशसेवा करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान असल्याची अभिमानास्पद भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तर सुजाताची आई सविता रामचंद्र मडके यांनी सांगितले कि माझ्या मुलीला चित्रकलेचा छंद आहे त्यातूनच तिने शास्रज्ञ होण्याचा मानस लहानपणीच बोलून दाखवला होता आणि आज तिने प्रचंड मेहनतीद्वारे हे स्वप्न सत्यात उतरवले याचा मलाही अभिमान वाटतो.

सुजाताची बहीण चेतना अमितकुमार सोनावणे ही सुजाताच्या प्रेणादायी प्रवासाची साक्षीदार असल्याचे सांगत सुजाताच्या ८ ते १२ तास सलग अभ्यासात मेहनत घेतल्याने तिला फळ मिळले. आम्ही चार भावंडापैकी सुजाता लहानापासूनच अतिशय हुशार होती त्यामुळं ती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम (इस्रो) करण्याचे स्वप्न साकार झाले.

सुजाताचा आजपर्यतचा जीवन प्रवास…

इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण (Primary Education) जिल्हा परिषद शाळा, मुपो शिरगांव येथून पुर्ण केले. नंतरचे शिक्षण जी व्ही खाडे विद्यालय, शहापूर येथून पूर्ण केले. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) मध्ये ९४.९१ टक्के गुण प्राप्त केले. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC) मध्ये तिने ७७.५० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

त्यानंतर तिने बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे जि रायगड येथून पूर्ण केले आहे. सुजाताने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट -३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे. यापुर्वी तिची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्कोमध्ये निवड झालेली होती.

संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना (DRDO) मध्ये सायंटिस्ट – बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पास होऊन सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होत्या. त्याचदरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर एससी (SOSC) या पदावर तिची निवड झाली आहे.

तिचे पद पे मॅट्रिक्स मध्ये लेव्हल १० इतक्या उच्च दर्जाचे असून इस्रो संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करताना तिच्या हातून आपल्या देशाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोलाचे कार्य व्हावे आणि तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा